शिवाजीनगर पुल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित

0

जळगाव । शिवाजीनगर पुलावरील रस्त्याप्रमाणेच आता या पुलाच्या जबाबदरातीतून महापालिका मुक्त झालेली आहे. शिवाजीनगर पुलाच्या बाबत आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश आज देण्यात आले आहेत. शिवाजीनगर पुलाला 100 वर्ष पूर्ण झाले असून पुलाची कालमर्यादा संपलेली आहे. या पुलाचे नूतनीकरण गरजेचे असून रेल्वेच्या तिसर्‍या लाईनसाठी या पुलाचे काम करणेचे गरजेचे आहे. याबाबत रेल्वे व मनपाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत मनपाने आर्थिक परिस्थिती नसून काम रेल्वे विभागाने करण्याचे सुचविले होते. यावर राज्यशासन 50 टक्के व रेल्वे विभाग 50 टक्के निधी देवून पूल दुरुस्तीचा प्रश्‍न मार्गी लावण्याबाबत चर्चा सुरू होती. याबाबत 18 एप्रिलला मुख्यमंत्री व रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यात व्हीसीद्वारे चर्चा होवून पुलाच्या कामाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानुसार आज मुंबई येथे नगरविकास विभागात आढावा बैठकीत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर महापालिका आयुक्त जीवन सोनवणे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्रींनी दिलेल्या सूचनांनुसार पुलाचे हस्तांतर हे बांधकाम विभागाकडे देण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.