शिवाजी महाराजांना जाणून घेण्यासाठी समाजातील द्वेष दूर करण्याची गरज

0

जळगाव । महाराजांना जाणून घेण्यासाठी समाजातील द्वेष दूर करावे लागतील. शिवरायांच्या स्वराज्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतीक व मानसशास्त्रीय धोरण होती. माझ्या शेतकर्यांसाठी स्वतंत्र निर्णय व्यवस्था होती. शिवबांच्या काळात कधीही शेतकरी आत्महत्या झाली नाही. परंतु आजच्या प्रगत भारतात शेतकरी राजा भिकारडा झालाय. जिवाला कंटाळून आत्महत्या करतोय आणि सरकार महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतेय. स्वप्न जरूर पहावीत परंतु कोणत्या दिशेने आपला प्रवास आहे याची जाणीव ठेवायला हवी. महाराजांचे गुण आचरणात आणण्याची जास्त गरज आहे. तेव्हाच आजच्या काळात एक थोर आणि समाजप्रिय व्यक्ती म्हणून जगता येईल असे मत प्रसिद्ध वक्ते योगेश पाटील यांनी व्यक्त केले.

महाराजांचे गुण तरुणांनी आत्मसात करावे
शिवाजी महाराज देशाचे राजे आहेत. शिवाबा एक क्रांतिकारी राजे होते. त्यांचे सर्व गुण आजच्या तरुणांनी आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांच्या सारखा सखोल ज्ञानी राजा पुन्हा जन्माला येणार नाही हे शास्वत सत्य आहे असे मत प्राचार्य डॉ.प्रभाकर भट यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी सौरभ मोडक व अमोल देशमुख यांनी देखील आपले मत व्यक्त केले. प्रसंगी सूत्रसंचालन निखील जगताप, अनघा अलोणी तर आभार गौरव भदाणे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंखेने विद्यार्थी उपस्थित होते.

सामाजिक विकास करा
पाटील पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिवाजी महाराज आपले दीपस्तंभ आहेत. माणसाला माणसासारखे जगण्यासाठी संस्कार केंद्र महाराज आहेत. त्यांचे चारित्र्य आत्मसात करा आणि तसे आपले चारित्र्य घडविण्याचा प्रयत्न करा. महाराजांची जयंती साजरी करून उपयोग नाही तर त्यांच्या कार्याचा भार आपल्या खांद्यावर घेऊन सामाजिक विकास करा. जातीयवाद, धर्मवाद यामुळे हिंसा करणारे समाज कंटक खूप आहेत. यासाठी त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी आणि आजचा जातीयवाद मोडीत काढयला हवा असेही त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवरायांचे स्वराज्य आणि सामाजप्रेम याविषयावर ते बोलत होते. यावेळी आयोजित शिवमहोत्सवात ढोल पथक, लेझीम पथक व तुळस दिंडी सोबत महाराजांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश रायसोनी, योगेश पाटील, डॉ. प्रभाकर भट, प्रा.राकेश तिवारी, सौ.राजुल रायसोनी, सौरभ मोडक, अमोल देशमुख, आनंद धारणे आदी मान्यवर उपस्थित होते.