शिव थापा, गौरव बिधुरीची अंतिम फेरीत धडक

0

नवी दिल्ली । भारताचा आशियाई रौप्यपदक विजेता बॉक्सर शिव थापा (60 किलो) आणि गौरव बिधुरीने झेक रिपब्लिकमध्ये सुरू असलेल्या ग्रापी उस्ती नाद लॅबेम बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याशिवाय भारताच्या पाच अन्य बॉक्सर्सनेही आगेकूच कायम राखत उपांत्य फेरीतले स्थान निश्‍चित केले आहे. शिवाने उपांत्य फेरीत यजमान संघटनेच्या एरिक हुलेइव्हचा पराभव केला. बिधुरी उपांत्य फेरीत नशिबवान ठरला.

प्रतिस्पर्धी रिंगमध्ये हजर न झाल्यामुळे त्याचा आपसूकच अंतिम फेरीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. अन्य लढतींमध्ये भारताच्या कविंदर बिष्ट (52 किलो), अमित फंगल (49 किलो), सुमित संगवान (91 किलो), मनिष पनवर (81 किलो) आणि मनोजकुमारने (69 किलो) कांस्यपदक पक्के केले आहे. सुमितने झेक रिपब्लिकच्या जिरी हॉर्कीचा पराभव केला.

मनिषने बेल्जीयमच्या यासिन आयदिरला मागे टाकत पुढच्या फेरीत स्थान मिळवले. जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे 25 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार्‍या जागतीक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या नऊपैकी सात बॉक्सर्स झेक रिपब्लिक ग्रापी स्पर्धेत खेळत आहेत.