शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवणार

खासदार धैर्यशील माने यांचे मुक्ताईनगरात अभियान प्रसंगी प्रतिपादन

मुक्ताईनगर : शिवसेनेचे शिव संपर्क अभियान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राबवले जात असल्याचे प्रतिपादन मुक्ताईनगर येथे हातकणंगले, जि.कोल्हापूर येथील खासदार धैर्यशील माने यांनी केले. राज्यात घरा-घरात शिवसेना पोहोचवण्याचे शिवधनुष्य शिवसैनिकांनी उचलले असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात रावेर लोकसभा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे कार्य अतिशय जोमाने सुरू असल्याबद्दल आमदार पाटील यांचे कौतुक देखील त्यांनी या जाहीर सभेत खासदारांनी प्रसंगी केले.

11 मतदारसंघात भगवा फडकणार
जळगाव जिल्ह्यात 11 पैकी पाच आमदार हे सेनेचे असून लवकरच भगवा विचार संपूर्ण अकरा ही मतदारसंघात पोहोचणार, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी केली. महालक्ष्मीच्या गावातील मी मुक्ताईचा आशीर्वाद घेऊन बाळासाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी प्रतिपादन केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर, आमदार चंद्रकांत पाटील, गजानन मालपुरे, गजानन खोडके, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, सुनील पाटील, पंकज राणे, अफसर खान, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, हाजी सहित बागवान, नवनीत पाटील, पंकज कोळी, प्रफुल्ल पाटील, छोटू पाटील, सुरज परदेशी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन पंकज पांडव यांनी तर आभार प्रवीण चौधरी यांनी मानले.

केंद्रा सरकारकडून सुड बुद्धीने ईडीच्या धाडी : खासदार माने
जाहीर सभेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत धैर्यशील माने यांनी सांगितले की पक्ष बांधणी साठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात हे अभियान सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या टिकेबाबत सांगितले की, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महिलांचा आदर करायला हवा. ईडीचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असून सूडबुद्धीने ते वागत असून पक्ष व नेते बघून कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई संदर्भात केंद्र व राज्याने समन्वय साधने आवश्यक आहे परंतु राज्याला नागरीकांना जर दिलासा द्यायचा असेल तर केंद्राकडे असलेला जीएसटीचा परतावा मिळणेदेखील गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर होणार्‍या राजकीय टीकेवर बोलताना खासदार माने यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील हे अत्यंत प्रामाणिक शिवसैनिक असून एकनाथराव खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. बाहेरचे लोक दृष्ट लावण्यासाठी टपून बसलेल्या असताना महा विकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.