अमळनेर । मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने विविध विद्यार्थी संघटनांनी प्रताप महाविद्यालयात आंदोलन केले. पैशांअभावी अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती विद्यार्थी नेत्यांनी व्यक्त केली आहे. शासनातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वर्गाप्रमाणे 3 ते 10 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. मात्र प्रताप महाविद्यालयात गेल्यावर्षीच्या शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता. केंद्र शासनाकडून 70 टक्के आणि राज्य सरकारकडून 30 टक्के अनुदान मिळत असते. शासनाने अनुदान दिले नाही तसेच ऑनलाईन पोर्टलमध्ये अडचणी येत असून अपडेशन सुरू आहे.
प्रताप महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर घोषणा
24 रोजी दुपारी 12 वा भारतीय विद्यार्थी मोर्चा, समता विद्यार्थी आघाडी, युवा रिपब्लिकन विद्यार्थी परिषद, प्रताप विद्यार्थी आघाडी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रताप महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर एकत्र जमून प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष ही करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने प्राचार्य ज्योती राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती लवकर जमा करावी, नाममात्र फी वर पुढील वर्षाचा प्रवेश देण्यात यावा आणि लवकर शिष्यवृत्ती न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला शिष्टमंडळात समाधान मैराळे, अफाग शेख, सिध्दार्थ सपकाळे, राहुल पाटील, भारती मोहिते, मयूर चौधरी, ज्ञानेश्वर जाधव आदींचा समावेश होता यावेळी वैशाली भदाणे, भीमराव मैराळे, पूजा पाटील, पल्लवी साळुंखे, स्वाती पाटील, नाजीम पिंजारी आकाश भोई हजर होते.