शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

0

पुणे । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम  निकाल जाहीर करण्यात आला. पाचवीचा 21.43 तर आठवीचा 13.45 टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या निकालात मोठी घट झाली आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची अंतीम यादी 15 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 2015 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 4 थी व 7 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अनुक्रमे 56.94 व 42.96 टक्के इतका लागला होता. त्या तुलनेत इयत्ता 5 वी व 8 वीच्या परीक्षेचा निकाल कमी लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेच्या http://mscepune.in/या वेबसाइटवर पाहता येईल. विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकून त्यांचा निकाल पाहता येणार आहे. तसेच, शाळांनादेखील युडायस क्रमांक टाकून निकाल पाहता येईल.

यंदा पाचवीच्या 5 लाख 26 हजार 597 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यामधील एक लाख 12 हजार 856 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा निकाल 21.43 टक्के इतका लागला आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी केवळ 52 हजार 657 विद्यार्थी पात्र ठरले असून परीक्षेचा निकाल 13.45 टक्के लागला आहे.

निकालाविषयी अडचणी असल्यास विद्यार्थ्यांना निकालाच्या छायांकीत प्रतींसह 31 मेपर्यंत परिषदेकडे अर्ज करता येणार आहे. तसेच, गुण पडताळणी करण्यासाठीही अर्जाची मुदत 31 मे पर्यंत राहील. आलेल्या अर्जाचा विचार करून 15 जूनपर्यंत अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यावेळी शिष्यवृत्ती कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार हे स्पष्ट होईल, असे परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले.