अडचणी दुर न झाल्यास आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा
शहादा – नंदुरबार जिल्ह्यातील उच्च, तंत्रशिक्षण तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून या अडचणी दूर करुन शिष्यवृत्ती मंजूर करावी, अन्यथा मनसेच्यावतीने आंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थ्यांच्यावतीने प्रकल्प अधिकार्यांसह आयुक्त व विविध अधिकारी, पदाधिकार्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीयांसह आर्थिक दृष्टया इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण व निर्वाहाच्या दृष्टीने शासनातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. भारत सरकार तसेच राज्य शासनाच्यावतीने विविध योजनेतून शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना अदा केली जाते. महाविद्यालयीन उच्च, तंत्र, व्यावसायीक शिक्षणासाठी इच्छूक विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी वंचित राहू नये यासाठी कायद्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे बंधनकारक आहे. सदर अभ्यासक्रमांना प्रवेशीत विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करतात. मात्र ऑनलाईन अर्ज दाखल करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील अशा अभ्यासक्रमांना प्रवेशीत व सद्यस्थितीत द्वितीय, तृतीय व अंतीम वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरतांना सध्या अडचणी येत आहेत. ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची अंतीम मुदत 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत आहे.
निवेदनावर यांच्या आहे स्वाक्षर्या
आधीच दुष्काळी परिस्थितीने होरपडणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याची बाब म्हणजे त्यांना आत्महत्त्येस प्रवृत्त करण्याचाच प्रकार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांपुढील ही समस्या वेळीच दूर करुन न्याय द्यावा अन्यथा कायदेशीर आंदोलन उभारण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा ईशारा पत्रान्वये देण्यात आला आहे. निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायसवाल यांच्यासह कातसिंग वळवी, नवलसिंग पावरा, स्वप्निल वळवी, कैलास पावरा, लालसिंग वळवी, गोपाल पावरा आदींची स्वाक्षरी आहे.