शीरखुर्मा’साठी शेवयांसह ड्रायफ्रूटने बाजारपेठ भरली

0

रमजान ईदसाठीसाठी मुस्लिम बांधवांच्या घरोघरी बनतो स्वादिष्ट पदार्थ
देशी, परदेशी बनावटीच्या सुरमा, अत्तरला मागणी

पिंपरी-चिंचवड : रमजान ईद निमित्त बनवला जाणारा स्वादिष्ट पदार्थ म्हणजे ‘शीरखुर्मा’. शीरखुर्माची लज्जत वाढवणारा प्रमुख घटक म्हणजे शेवया. या शेवयांची रमजानच्या काळात मोठ्या प्रमाणात विक्री होते. दोन दिवसांवर ईद आल्यामुळे सध्या बाजारपेठ काजू, बदाम, पिस्ते, चारोळी अन् बनारसी, पंजाबी शेवयांनी सजली आहे. तर, अत्तरे, सुरमा यांसारख्या विविध वस्तूंनी बाजारपेठेचा नूर पालटून गेला आहे.

बिर्याणीसाठी विविध मसाले
शिरखुर्म्यासाठी खोबरे, मनुके, आक्रोड, केशर, शुद्ध तुप, बदाम, पिस्ता, चारोळी, काजू, वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स तसेच बिर्याणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या खजूरही विविध दुकानातून उपलब्ध आहे. शेवई 50 ते 70 रुपये किलो, आक्रोड 900 रुपये तर उत्तम प्रकारचे खजूर 70 ते 140 रुपये किलो या दराने विकले जात आहेत.

शेवयांचा दर 60 ते 140
सध्या बाजारात आलेल्या शेवयांमध्ये फेणी 60 रुपये किलो, तुपातील शेवया 100 रुपये किलो, हाताने तयार करण्यात आलेल्या शेवयांची किंमत 120 ते 140 रुपयांपर्यंत आहे. गेल्या वर्षी हाताने तयार करण्यात आलेलया शेवयांची किंमत ही 80 ते 100 रुपयांपर्यंत होती, परंतु त्यात किलोमागे 40 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. किमतीत वाढ होऊनही शेवयांच्या मागणीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. “सुकामेव्यापासून ते अगदी शेवयांसह सर्व वस्तू आम्ही मुंबई बाजारपेठेतून मागवितो. मुंबई, बनारस, राजस्थान, पंजाब येथून शेवया येतात अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

कापड दुकानांमध्ये गर्दी
देशी, परदेशी बनावटीच्या सुरम्याला रमजानमध्ये आवर्जून मागणी असते. स्त्रिया आणि पुरुषांसाठी निरनिराळ्या प्रकारचा सुरमा, अत्तरही विविध दुकानांतून उपलब्ध झाली आहेत. दरम्यान, शहरात सर्वत्र कापड दुकानांतून रमजाननिमित्त कपडे खरेदीसाठी मुस्लिम महिलांसह आबालवृद्धांची वर्दळ वाढली आहे.