पुणे । जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने येत्या शुक्रवारपासून (ता. 18) जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये खरिपाबाबतचा तालुकास्तरीय आढावा घेऊन संभाव्य नियोजन केले जाणार आहे. शिवाय जिल्ह्यातील शेतकर्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यावर प्रभावी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
पाणीटंचाईचा आढावाही घेणार
याच बैठकांमध्ये चारा उपलब्धता आणि पाणीटंचाईचाही आढावा घेण्यात येणार आहे. बैठकांची सुरवात जुन्नर तालुक्यातून होणार असून, समारोप बारामती तालुक्यात होणार असल्याचे विश्वास देवकाते यांनी सांगितले. या बैठकांना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकर्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवकाते यांनी केले आहे.
अडचणी समजून घेणार
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यावर त्वरित उपाययोजना करता याव्यात, या उद्देशाने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात येते. तालुका पंचायत समितीच्या मुख्यालयात या बैठका घेतल्या जातात. यासाठी सुजाता पवार, सूरज मांढरे, एन. पी. मित्रगोत्री, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सर्व सभापती, संबंधित पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सुनील खैरनार, डॉ. श्रीराम पवार आदींसह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत.