‘शून्य अन्ननासाडी’ प्रबोधनासाठी मुंबईत धाव

0

मुंबई : ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे दत्तू बबन भोकनळ आणि अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते संजीवा सिंग यांनी ’शून्य अन्ननासाडी’ प्रबोधनासाठी आयोजित केलेल्या इंडो मशाल दौडमध्ये गिरगाव चौपाटी ते हाजी अली मार्गावर धावून मशाल आणि तिरंगाद्धारे नागरिकांना अन्नाची नासाडी करू नये यासाठी आवाहन केले. तसेच मुंबईचे डबेवाले आणि अनेक नागरीक हातात पोस्टर आणि फलक घेऊन नागरिकांना अन्नाची नासाडी करू नये यासाठी आवाहन करीत होते. ’मॉर्फियस क्रिएशन इंडिया’ या मुंबईस्थित संस्थेतर्फे या इंडो मशाल दौडचे आयोजन गिरगांव चौपाटी, हाजी अली, वरळी सीफेस, महापौर बंगला, सायन हॉस्पिटल, दादर टीटी, लालबाग, जिजामाता उद्यान आणि हुतात्मा चौक अशा मार्गावर करण्यात आले होते.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ’शून्य अन्ननासाडी’ प्रबोधनासाठी आयोजित केलेल्या इंडो मशाल दौडचे महापौर निवासस्थानाजवळ स्वागत करून त्यांना पुढच्या मार्गासाठी शुभेच्छा दिल्या. एक ज्वलंत सामाजिक विषय घेऊन समाजात जनजागृती करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रविवारी दरवर्षी ’इंडो टॉर्च रन’ अर्थात इंडो मशाल दौडचे आयोजन करण्यात येते. यंदाचा विषय ’शून्य अन्ननासाडी’ हा निश्चित करण्यात आला होता.

डबेवालेही सहभागी
यावेळी मुंबईचे डबेवाले या दौडचे ‘ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर’ होते. मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करणारे आणि मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जाणारे ’मुंबईचे डबेवाले’ या दौडमध्ये चांगल्या सामाजिक कार्यासाठी सहभागी झाले होते. तसेच मुंबई विद्यापीठाशी संलग्न 250 महाविद्यालयांमध्ये ’अन्ननासाडी’ या विषयावर पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.

भारतातील अन्नाची नासाडी
अन्ननासाडी हा आता अगदी गंभीर असा विषय झाला आहे. अन्न आणि शेती संगठना (एएफएओ)ने दिलेल्या आकडेवारीनुसार 1.3 अब्ज टन अन्न हे दरवर्षी वाया जाते. एएफएओच्या अहवालानुसार देशातील एकूण उत्पादनापैकी एक तृतीयांश अन्न उत्पादन हे वाया जाते. याचाच अर्थ जागतिक अर्थव्यवस्थेला त्याची 750 अमेरिकन डॉलर किंवा 47 लाख कोटी रुपये एवढी किंमत चुकवावी लागते. आशियामध्ये भारत आणि चीन या दोन देशांमध्ये 1.3 अब्ज टन अन्न दरदिवशी फुकट जाते.