शेंदुर्णीत पथसंचालन : लॉकडाऊन झुगारल्यास कारवाई

0

शेंदूर्णी (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. जमावबंदीचे आदेश जारी करूनही शहरातील नागरिक आदेशांचे उल्लंघन करून पोलिसांची परिक्षा पाहत आहे. पोलिसांचे वाहन पुढे गेल्यानंतर तरुण पुन्हा रस्त्यावर येत आहे. नागरिकांना वारंवार सूचना दिल्यानंतरही शहरात बेशिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज शहरात पथसंचलन करून नागरिकांना घरातच राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन नियम मोडल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

शेंदुर्णीतील चाळीस हजार लोकवस्ती व आजूबाजूला असलेल्या १४ खेड्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केवळ एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व ३ पोलीस नियुक्तीस आहेत. तोकडे पोलीस बळ असल्याने जमावबंदी व संचारबंदी आदेशाला झुगारून लोक रस्त्यावर फिरत आहेत. गावातून एकवेळ पोलीस पथसंचालन करून कायद्याचा धाक निर्माण करावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच आर.सी.पी फोर्स जळगांव यांना बोलावून पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सर्व कर्मचार्‍यांसह पथसंचलन केले. यावेळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे यांच्या उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले.