शेंदुर्णी परिवहन मंडळाच्या वाहतूक नियंत्रण कक्षाचे तीन तेरा!

0

शेंदूर्णी । येथील परिवहन महामंडळाच्या वाहतूक नियंत्रण कक्षाचे तीन तेरा वाजले असून गेल्या चार महिन्यांपासून फुटक्या पत्र्यामध्ये पोते कोंबून गेल्या चार महिन्यांपासून येथे कामकाज सुरू आहे. दुरूस्तीची मागणी करूनही याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महामंडळ कर्मचारी बिकट परिस्थितीत काम करीत असल्याचे एक उदाहरण समोर आले आहे.

चार महिन्यात केवळ मोजमाप
चार महिन्यांपूर्वी वाहतूक नियंत्रण कक्षावर माकड कुदल्यामुळे त्यावरील सिमेंट पत्रे तुटली तेव्हा पासून तुटलेल्या भागात पोते कोंबण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रक संजय ठाकूर येथील कक्षात बसून विद्यार्थ्यांचे शालेय पासेस देण्याचे तसेच बस नियंत्रणाचे काम करीत आहेत. 4 महिन्यांपूर्वी जामनेर परिवहन डेपो मॅनेजर यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करून े पावसाळ्यात दप्तर ओले होऊन नुकसान होईल या बाबतीत कळविण्यात आले होते. त्यानंतर जामनेर डेपो मॅनेजर यांनी परिवहन महामंडळाच्या जळगांव विभाग परिवहन नियंत्रकांना पत्र पाठविले गेले चार महिन्यात राज्य परिवहन मंडळाचे जळगाव कार्यालयाने फक्त ठेकेदारास मोजमापे करण्यासाठी पाठवले, परंतु नंतर कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही.

विद्यार्थ्यांना फटका
नियंत्रण कक्षात या पावसाळ्यात पूर्णपणे पावसाचे पाणी साचणार आहे. त्यात येथील शालेय विद्यार्थी पासेसचे दप्तरही भिजनार आहे, तसेच पावसाचे पाणी इलेक्ट्रीक मीटर मध्ये जाऊन हानी होण्याची भीती आहे. नियंत्रण कक्ष केबिन नसल्याने येथील विद्यार्थी पासेस सुविधा बंद होऊन विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता असून दुरूस्तीची मागणी होत आहे.

अन् बसपोर्टचे स्वप्न
एकीकडे जामनेर येथे परिवहन महामंडळ राज्यातील पहिले बस पोर्ट उभारत आहे. त्याच डेपोच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यातील मोठी नगरपंचायत व जामनेर डेपोस उत्पन्न मिळवून देणार्‍या शेंदूर्णी वाहतूक नियंत्रक कक्षाचे फुटलेले पत्रे बदलविण्यासाठी जामनेर व जळगांव परिवहन महामंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.