नवी दिल्ली – भांडवल बाजाराचे नियमन करणाऱ्या ‘सेबी’कडून सध्या छद्मी अर्थात शेल कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. ‘सेबी’ने ३३१ शेल कंपन्यांवर कारवाईचा निर्णय घेतला असून १०० संशयास्पद फर्मवरील कारवाईला सुरूवातही केली आहे. बिल्डर, दलाल आणि बॉलिवूडशी संबंधित या कंपन्या आहेत असे दिसून आले आहे. मुख्य कंपन्यांनी काळे धन आणि अन्य आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी शेल कंपन्या काढलेल्या आहेत.
काही कंपन्यांनी सेबीच्या निर्णयाविरोधात न्यायाधिकरणाकडे धाव घेऊन थांबलेली कारवाई न्यायाधिकरणाच्याच परवानगीने सुरू झाली आहे. सेबी व्यतिरिक्त इनकम टॅक्स, अमलबजावणी संचालनालय आणि सिरिअस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन ऑफिसकडुनही शेल कपन्यांची चौकशी होत आहे. बऱ्याचशा कंपन्यांनी आपण आर्थिक गैरव्यवहार पचविण्यासाठी काढलेल्या कंपन्या अर्थात शेल कंपन्या नसल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर केल्यामुळे बराच काळ भांडवली बाजार क्षेत्रात गोंधळाचे वातावरण होते.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की सेबीच्या यादीतील आणि यादी बाहेरील ५०० कंपन्यांची चौकशी होऊ शकते. त्यांची नावे आताच जाहीर करता येणार नाही. या कंपन्यांना लेखा परीक्षण, वार्षिक रिटर्न भरल्याचे प्रमाणपत्र, आयकर विभागातील चौकशीचा तपशील आणि कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन यांची माहिती सेबीच्या चौकशी यंत्रणेला द्यावी लागेल. शेल कंपन्यांची संख्या सर्वात जास्त पश्चिम बंगालमधे आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीतील कंपन्यांचा क्रमांक लागतो.
कारवाईची आकडेवारी…..
३३१ कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार.
१२७ कंपन्या पश्चिम बंगालमधील
५० कंपन्या महाराष्ट्रातील
३० कंपन्या अनुक्रमे गुजरात आणि दिल्लीतील
१२४ कंपन्यांवर करचोरीचा आरोप
१७५ कंपन्यांची तपासणी सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसकडून