नवी दिल्ली : शेअर बाजाराने आज मोठी उसळी घेत तब्बल 31 हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही काळापासून शेअर बाजारात सातत्याने तेजीचे वातावरण आहे. मात्र आजची उसळी ही उच्चांकी आहे. निफ्टीदेखील 9,500 अंकांवर जाऊन पोहोचला आहे. यामुळे शेअर बाजारात आज दिवसभर कमालीचे उत्साहाचे वातावरण होते. तसेच शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी 30,768 या विक्रमी अंकावर स्थिरावला आणि शुक्रवारी हा विक्रम मोडीत निघाला. शेअर मार्केट तज्ज्ञांच्या निरिक्षणानुसार, लार्जकॅप शेअर्सच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीमुळे बाजारात तेजी आली.
दरम्यान, याव्यतिरिक्त यंदा मान्सून वेळेवर असल्याच्या अंदाजाचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आजच्या या उसळीमुळे टाटा स्टील, लक्ष्मी फायनान्स आणि एल अँड टी लिमिटेड या कंपन्यांचे समभाग वधारले आहेत. लार्जकॅप शेअर्सव्यतिरिक्त मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सचीदेखील मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.