शेअर बाजारात त्सुनामी! 5 लाख कोटी स्वाहा!!

0

सेन्सेक्ससह जगभरातील शेअर बाजार कोसळले

नवी दिल्ली : जगभरातील शेअर बाजारांसाठी मंगळवारचा दिवस घातवार ठरला. अर्थसंकल्पावरील चिंता आणि जागतिक पातळीवर शेअरविक्रीला आलेला जोर पाहाता, जगभरातील शेअर बाजार धडाधड कोसळले. जपानचा निक्केई हा निर्देशांक 4.6 टक्क्यांनी तर ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी कोसळलेत. दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. भारतीय शेअर बाजारातही जोरदार पडझड झाली; सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 1200 व 400 अंकांनी घसरले होते. कालच्या अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या धुळधाणीचे सावट जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आले. अमेरिकेच्या डाऊ इंडस्ट्रिअल या निर्देशांकाने 1600 अंकाची अभूतपूर्व घसरण नोंदविली. इतिहासामध्ये एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड आहे. एकाच दिवसांत गुंतवणूकदारांच्या तब्बल 5 लाख कोटी रुपयांना चुना लागला होता. सरकारी कर्जरोख्यातून मिळणारे वाढीव उत्पन्न व महागाई वाढण्याची भीती या दोन कारणांमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतल्याची माहिती अर्थतज्ज्ञांनी दिली. शेअर बाजारात आलेल्या या त्सुनामीमुळे जगभरातील सर्वाधिक श्रीमंत वारेन बफेट यांना तब्बल 5.30 अब्ज डॉलर्स (340 अब्ज रुपये) तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना 3.60 अब्ज डॉलर्स (230 अब्ज रुपये)चा चुना लागला आहे. इतर किरकोळ गुंतवणूकदार भुईसपाट झाले आहेत.

2011 नंतरची सर्वाधिक मोठी घसरण
भारतीय शेअरबाजार तर कोसळलाच, जपानचा निक्केई हा निर्देशांकदेखील 4.6 टक्क्यांनी कोसळला होता. ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. गेल्या 100 दिवसांमधल्या सरासरीखाली या तिनही शेअर बाजारांनी पातळी गाठली आहे. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 1200 व 400 अंकांनी घसरले होते. सोमवारी अमेरिकच्या डाऊ इंडस्ट्रियल या निर्देशांकाने 1600 अंकांची अभूतपूर्व घसरण अनुभवली. इतिहासामध्ये एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड आहे. अमेरिकी शेअर बाजारातील स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पूअर 4.1 टक्क्यांनी घसरला तर डाऊची घसरण 4.6 टक्क्यांची झाली. ऑगस्ट 2011 नंतरची ही सर्वाधिक मोठी घसरण ठरली आहे.

महागाई आणि व्याजदर वाढणार
अमेरिकी कर्जरोख्यांच्या उत्पन्नामध्ये झालेली भरघोस वाढ या घसरणीला कारणीभूत ठरली आहे. अमेरिकी कर्मचार्‍यांचे पगार अत्यंत वेगाने वाढत असून, 2009 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे महागाई वाढेल आणि व्याजदरही वाढतील असा अंदाज आहे. परिणामी, शेअर बाजारातील गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते असा विचार करून बाजारात विक्रीचा जोर दिसला.

1. अमेरिकन शेअर बाजारात सोमवारी ऑगस्ट 2011 नंतरची सर्वात मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर मंगळवारीदेखील अमेरिकी शेअर बाजार धडाधड कोसळला. त्याचे लोण जपान, चीनसह आशियाई बाजारपेठेतही पोहोचले. भारतीय शेअर बाजारदेखील झपाट्याने कोसळला.
2. केंद्रातील मोदी सरकारने 1 फेब्रुवारीपासून लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे गणित बिघडले आहे. एक वर्षापेक्षाअधिक काळ ठेवलेल्या शेअरवर जर लाखापेक्षा जास्त इनकम होत असेल तर गुंतवणूकदाराला 10 टक्के कर द्यावा लागणार आहे.
3. एका दिवसात वारेन बफेट व झुकेरबर्ग यांना 570 अब्ज रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडावे लागले आहे. अमेरिकी शेअर बाजारातील स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पुअर 4.1 टक्क्यांनी तर डाऊची घसरण 4.6 टक्क्यांनी झाली आहे. जर्मनीसह अन्य युरोपिय शेअर बाजारदेखील धडाधड कोसळले होते.