शेअर मार्केटमधून पैसे मिळवून देण्याचे आमिष ; तरुणाला सव्वा दोन लाखांचा गंडा

0

जळगाव – शेअर मार्केटमधून पैशांची गुंतवणूक करुन जास्त पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून शाम आत्माराम सटाले वय 40, रा. साई पार्क, अयोध्या नगर या तरुणाला तीन जणांनी 2 लाख 35 हजार 700 रुपयांत गंडविल्याची घटना समोर आली आहे. विश्‍वास संपादन करुन तिघांनी वेगवेगळ्या बहाण्याने ही रक्कम खात्यावर जमा करण्यास सांगून ही फसवूण केल्याचे समोर आले आहे. 14 डिसेंबर 2019 ते 14 एप्रिल 2020 दरम्यान घडलेल्या या प्रकाराबाबत शनिवारी एमआयडीसी पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भामट्याने फोन करुन हेरले
याबाबत माहिती अशी की, जळगावातील अयोध्यानगर साई पार्क येथे शाम सटाले हे कुटुंबासह राहतात. चेन्नई येथील फोर्टस इंडिया लॅबोरेटीस या कंपनीत ते एरीया मॅनेजर म्हणून कामाला आहे. ते त्यांचे डिमॅटच्या खात्याच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडींगचे काम करत असतात. फेसबुकवर शेअर मार्केटसंबंधीची माहिती शेाधत होते. यादरम्यान 14 डिसेंबर 2019 रोजी त्यांना दिलीप मिश्रा नामक व्यक्तीचा फोन आला व त्याने फ्रिडम ग्लोबल रिसर्च नावाची कंपनी असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये चांगला नफा कमवून देऊ शकतो, त्यासाठी 18 हजार तीन महिन्यांची फी भरावी, असे त्याने सांगितले. त्यानुसार कंपनीचे मालक संदीप भारद्वाज यांच्या खात्यावर आधी 6 हजार रुपये नंतर 12 हजार रुपये असे एकूण 18 हजार रूपये सटाले यांनी फोन पेच्या माध्यमातून ऑनलाईन जमा केले.

हप्त्यानेही पैसे भरण्याची दिली सवलत
पैसे भरले असून त्याची रिसीटची मागणी केली असता सटाळे यांना मिश्रा याच्याकडून उडावाउडवीची उत्तरे मिळाली. पुन्हा मिश्रा याने 14 लाख रूपये कमवून देतो सांगत त्यासाठी 2 लाख 400 रूपये भरावे लागतील असे सांगितले. सटाले यांनी एवढी रक्कम नाही सांगताच तुम्ही हप्त्याने पैसे भरावे अशी सवलत देवून विश्‍वास संपादन केला. अशाप्रकारे भामट्याच्या मागणीनुसार सटाले यांनी वेळावेळी संबंधितांच्या खात्यावर एकूण 2 लाख 35 हजार 577 एवढी रक्कम ऑनलाईन फोन पेच्या माध्यमातून जमा केली. यानंतरही फाईल पूर्णच्या नावाखाली पैशांची मागणी झाल्यावर सटाले यांना संशय आला. पैसे परत मिळण्यासाठी संबधितांना संपर्क साधल्यावर उडवाउडवीचे उत्तरे तसेच टाळाटाळ करण्यात आली. फसवणुकीची खात्री झाल्यावर 2 मे रोजी सटाले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन फ्रिडम ग्लोबल कंपनीचे मालक संदीप भारद्वाज, दिलीप मित्रा व मल्होत्रा (पुर्ण नाव माहित नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.