शेतकरीही लवकरच वीज आणि इंधन निर्मिती करतील!

0

पिंपरी-चिंचवड : नाविन्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, ‘मेक इन इंडिया’ या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी असून, त्यावर आपले भविष्य अवलंबून आहे. देशातील शेतकरी पण पुढच्या काळात वीज व इंधननिर्मिती करतील. पेट्रोल, क्रूड ऑईलची देशाची आयात कमी करून शेतकरी पेट्रोलचा मालक कसा होईल, याची वाटचाल सुरू आहे. ते करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात शनिवारी आठवा पदवीप्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते.

सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
या पदवीप्रदान सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्त्रोचे सचिव ए. एस. किरणकुमार, शिवयोग गुरू अवधूत शिवानंद, वारणा सहकारी उद्योग समूहाचे प्रमुख विनय कोरे, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, कुलगुरू आर. एन. राजदान आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्त्रोचे सचिव ए. एस. किरणकुमार, शिवयोग गुरू अवधूत शिवानंद, वारणा सहकारी उद्योग समूहाचे प्रमुख विनय कोरे यांना डी. लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले.

राजकारणाचा बाजार झाल्याची खंत
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने विज्ञान, सहकार आणि अध्यात्म अशा तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना डी. लिट पदवी देऊन विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. स्वप्न, विचार दाखविणारे लोक फार काळ आवडत नाहीत. मात्र, स्वप्न दाखवून ते पूर्ण करून दाखवितात, ते सर्वांना अधिक आवडत असतात. राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण झाल्याचे दुर्भाग्य आहे. राजकारण म्हणजे विकासकारण व राष्ट्रकारण हा त्याचा खरा अर्थ आहे. मात्र, सध्या राजकारणाचा बाजार झाला असल्याची खंतदेखील गडकरी यांनी व्यक्त केली.

शेतकर्‍यांच्या विकासासाठी प्रयत्न
नाविन्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, मेक इन इंडिया या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी असून त्यावरच आपले भविष्य अवलंबून आहे. देशातील शेतकरी वीज व इंधननिर्मिती पुढच्या काळात करेल. शेतकर्‍यांच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न चालू आहेत. बाहेरच्या देशात बसेससाठी 55 लाख रुपयांत तयार होणारी विद्युत बॅटरी आपल्या देशात पाच ते सात लाखांतच बनविण्याचा इस्त्रोचा प्रयत्न आहे. वेगवेगळे प्रयोग व संशोधन सुरू असून, त्याचा फायदा येत्या काळात देशाला व समाजाला होणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

शिक्षणावरील खर्च भविष्याची गुंतवणूक
शिक्षणातून ज्ञान मिळत असल्याने व्यक्ती प्रगल्भ होतो. शिक्षणावर होणारा खर्च ही भविष्यातील भांडवली गुंतवणूक आहे. डॉक्टर, इंजिनियरबरोबरच देशाला चांगल्या माणसांचीही गरज आहे. ते काम आपल्या संस्कृतीतील जुने विज्ञान म्हणजे अध्याम, योग या गोष्टी करतात. तसेच, आयुष्यात काही मिळविण्यासाठी कधी कोणाच्या गळ्यात हार घातला नाही आणि कोणाच्या स्वागताला विमानतळावर गेलो नाही. तरीही सर्व काही मिळत गेले, असेही गडकरी यांनी सांगितले.