भुसावळ। राज्यात शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपदांमुळे हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर चढत असून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र शासन यासंदर्भात काहीएक उपाययोजना करतांना दिसून येत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मरणाची वाट पाहत आहे. शेतकरी समृध्द झाला तरच देशाचा खर्या अर्थाने विकास होवू शकतो. त्यामुळे शासनाने शेतकरीहिताच्या दृष्टीने योजना राबवून त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
पिकविम्याची रक्कम लवकरात लवकर द्यावी
भुसावळ परिसरात सप्टेंबर 2016 च्या दरम्यान अतिवृष्टी झालेली होती. शासनाच्या कृषी विभागाने तलाठ्यांसोबत विविध भागात पंचनामे केले. परंतु आजतागायत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसान भरपाईसाठी शेतकरी कार्यालयाच्या चकरा मारत आहे. तसेच पिकविमा असंख्य शेतकर्यांनी काढलेला आहे. लाखो रुपयांचे नुकसान या शेतकर्यांचे झालेले असतांना पिकविम्याची रक्कम देखील त्यांना मिळत नाही.
उपाययोजना कराव्या
दुष्काळ आणि अवकाळी पाऊस, गारपीठ अशा विविध समस्यांवर तसेच कर्जाने होरपळेल्या शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेत पाणी टंचाई, जलयुक्त व जलसंधारणा कामे, दुष्काळावर मात आणि उपाय योजना करणे. शेतकरी आत्महत्त्या कुटूंबाना मदत करणे, प्रत्येक शेतकर्याला मासिक 5 हजार रुपये वेतन मिळावे, 45 दिवसात संजय निराधार योजनेचा लाभ देणे, पिवळे काडे धारक विधवा महिलेस 20 रुपये मदत करणे तसेच जलयुक्त व जलसंधारणाची कामे त्वरीत करावी.
यांच्या आहेत स्वाक्षर्या
आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे मासिक पाच हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन, शिक्षक सेना उपजिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, वाहतूक सेना जिल्हा सचिव रफिक खान, तालुका संघटक अबरार खान, प्रा. धिरज पाटील यांच्या स्वाक्षर्या आहे.