मुंबई | शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या यासह अन्य मागण्यांसाठी सुकाणू समितीच्या आवाहनानुसार, शेतकऱ्यांनी सोमवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. राज्याच्या अनेक भागातील महामार्ग व वाहतूक सकाळी 2 ते 4 तास ठप्प होती. वर्ध्यात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले तर पालघरमध्ये
शेतकऱ्यांनी भर पावसात महामार्ग रोखला. खामगावमध्ये राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली तर हिमायतनगरमध्ये प्रहार, शेतकरी सुकाणू समितीने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात आंदोलन केले. अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. नागपूरसह विदर्भातही ठिकठिकाणी चक्का जाम व धरणे आंदोलन करण्यात आले. ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, ‘एकच नारा सातबारा कोरा’, ‘मोदी सरकार होश मे आओ’ अशा घोषणा देत शेकडो शेतकऱ्यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. ‘प्रहार’ने संपूर्ण मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्यात सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अकोला मार्गावर टेंभूर्णा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, कैलास फाटे, डॉ. कविश्वर, दादा रायपुरे यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता.
तिरंग्याला हात लावू देणार नाही
सरसकट कर्जमुक्तीची अंमलबजावणी न करता छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याऱ्या देवेंद्र सरकारच्या पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी तिरंग्याला हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी पिंपळा धायगुडा (अंबाजोगाई जि.बीड) येथील ‘चक्का जाम’ आंदोलनावेळी दिला. बैलगाड्या, ट्रॅक्टर, मोटार सायकली आडव्या लावून शेतकरी आंदोलनात उतरले.
पालघर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद
पालघर | सुकाणु समितीने राज्यभर पुकारलेल्या चक्का जामच्या दिलेल्या हाकेला पालघर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, तालासरी ह्या तालुक्यांना महाराष्ट्र राज्य किसान सभा, जनवादी महिला संघटना, फेडरेशन ऑफ इंडिया तसेच शेतकरी यांच्या वतीने पावसाची संततधार सुरु असतानाही रास्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. जिल्ह्यातून जाणारे मार्ग चार ते पाच तास पूर्णपणे बंद झाले होते. पोलिसांनी अंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर 3 ते 4 तास चाललेले हे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातून जाणारे सर्व प्रकल्प रद्द करावे, असे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभा ठाणे-पालघर जिल्हा कमिटीकडून पालघर, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
आम्ही सारे शेतकर्याची पोरं
आम्ही सारे शेतकऱ्यांची पोरं असे फलक हातात घेत शेकडो विद्यार्थ्यांनी रॅली काढत अकोले शहरातून जाणारा कोल्हार-घोटी महामार्ग रोखून धरला. शेतकरी आंदोलनाचे केंदबिंदू ठरलेल्या पुणतांबा पासून सर्व अहमदनगर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अहमदनगर, संगमनेर, अकोले, शेवगाव आदी ठिकाणी सुकाणू समिती, शेतकरी संघटने सोबतच हमाल माथाडी संघटनेच्या वतीने रस्त्यावर धावणारी वाहनांची चाके थांबण्यात आली. शेतकर्याचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या,रोजगाराच्या संधी या मागण्या या वेळी मांडण्यात आल्या.
चक्का जाम आंदोलनामुळे प्रभावित वाहतून
हिमायतनगर-नांदेड-हैदराबाद, वाडा-विक्रमगड-जव्हार-डहाणु, खामगाव-अकोला-बुलडाणा, नागपूर-चंद्रपूर-हैदराबाद, यवतमाळ-दिग्रस-पुसद, नाशिक-मुंबई-पुणे-इंदूर, अहमदनगर-संगमनेर, वाडा-भिवंडी-मनोर, अकोले-शेवगाव, पुणतांबा-शिर्डी, कोल्हार-घोटी.
या आहेत मागण्या
गोवंश हत्त्याबंदीसह राज्यघटनेच्या परिशिष्ट 9 मधील शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत शेतकरी व शेतमजूरांच्या मुलांना मोफत शिक्षण, नोकरीत आरक्षण द्या शेतकऱ्यांना जाचक अटी न लावता सरसकट संपूर्ण कर्जमुक्त करा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा पेरणी ते कापणीपर्यंतची कामे मनरेगातून करावीत ऊत्पादन खर्च+50% नफा धरुन हमीभाव द्यावा दुबार पेरणीसाठी बी-बियाणे उलब्ध करून द्या मराठवाडा विभाग दुष्काळी जाहीर करा शेतकरी विधवांना पेन्शन लागू करा शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी