मुंबई – महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांतील सरकारांनी दिलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य भाजपाने आज कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या उदभवलेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकर्यांची स्थिती बिकट झाली आहे. राज्य सरकारने शेतमालाच्या खरेदीची व्यवस्था केलेली नाही. शेतमाल खरेदीचे पैसे केंद्राकडून दिले जातात. मात्र हा माल खरेदी करण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे. तसेच राज्यातील बारा बलुतेदारांसमोर मोठे संकट निर्माण झालेले आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारांप्रमाणेच राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांसाठी पॅकेज जाहीर करावे. दरम्यान, अद्याप अशाप्रकारचे पॅकेज जाहीर करण्यात न आलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आर्थिक पॅकेजबाबत जसे केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला.