शेतकरी विक्रेत्यांसाठी अल्पदरात भोजन; लायन्स क्लबतर्फे राबविला उपक्रम

0

तळेगाव दाभाडे- तळेगाव शहरातील आठवडे बाजारात शेतीमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकरी विकेत्यांना अल्पदरात भोजन सुरू करण्यात आले आहे. तळेगाव लायन्स क्लबतर्फे राबविलेल्या या उपक्रमास विक्रेत्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमात 10 रुपयात 3 पोळ्या, भाजी, आमटी, भात, खिचडी देण्यात येत असून खेड्यातून येणार्‍या शेतकर्‍यांना ताजे स्वच्छ आणि गरम जेवण मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून या योजनेचे स्वागत होते आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अध्यक्षा राजश्री शहा व त्यांचे सर्व सहकारी विशेष प्रयत्नशील आहेत. या योजनेचा भविष्यकाळात विस्तार करण्यात येणार असल्याचे क्लबतर्फे सांगण्यात आले.

200 विक्रेत्यांनी घेतला लाभ
तळेगाव लायन्स क्लबने दर रविवारी तळेगाव परिसर, मावळ तालुका, खेड तालुका, हवेली तालुक्यातून शेतमाल विक्रीसाठी आणणार्‍या शेतकर्‍यांकरिता अतिअल्प दराने भोजन पुरविण्याची सुविधा सुरू केली आहे. क्लबच्या अध्यक्षा राजश्री शहा, सचिव निलेश जैन, खजिनदार सुचित्रा चौधरी आणि प्रकल्प प्रायोजक संदीप काकडे, ज्योती जाधव, डॉ. दत्तात्रय गोपाळघरे यांनी आठवडे बाजारातील जुने पोलीस स्टेशन जवळील दत्त मंदिरात सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी 200 विक्रेत्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमाचे भाजी विकेत्यांनी उर्त्फुत स्वागत केले आहे.