शेतकरी संघर्ष सुरूच!

0

संघर्ष कधीही, कोणालाही न चुकलेला मग तो माणूस असो, प्राणी असो की साक्षात परमेश्‍वर! आयुष्य जगण्यासाठी, सुसह्य करण्यासाठी, झगडणे, अनंत अडचणींचा सामना करणे म्हणजे संघर्ष. सध्या महाराष्ट्रातील राजकारण असाच मोठा संघर्ष अनुभवत आहे, असे म्हटल्यास हरकत नाही. प्रत्येक पक्ष याची अनुभूती याची देही याची डोळा घेत आहेच. कर्जमाफीसाठी धडपडणार्‍या राज्यातील प्रत्येक शेतकर्‍याच्या संघर्षाला ढाल बनवून प्रत्येक पक्ष युद्धातील आपले डावपेच खेळत आहेत याला कोणीही नाकारणार नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून जरी आपल्या आंदोलनाला संघर्ष म्हटले असले, तरी इकडे विधानभवनात भाजप-सेनाही आपापल्या अस्तित्त्वांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी संघर्ष करतच आहेत.

दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस यांच्या नैसर्गिक मार्‍याने खचलेला शेतकरी राजकारणाच्या बासनात गुंडाळलेल्या कुचकामी शेतीविषयक धोरणांनी आणखी खचत आहे. रामेश्‍वर भुसारेसारख्या शेतकर्‍यासोबत झालेल्या मारहाण प्रकरणानंतर शाश्‍वत शेतीचे दाखले देणार्‍या सरकारवर किती आणि कसा विश्‍वास ठेवायचा, असा यक्षप्रश्‍न गरीब शेतकर्‍याला पडल्याशिवाय राहणार नाही. जान सलामत तो पगडी पचास म्हणत, अशा सरकारकडे मदत मागण्यापेक्षा शेतकर्‍याला आणखी काही महिन्यांचा संघर्ष केव्हाही चालेल असाच विचार त्याच्या मनात किर्रर्र करायला लागला असेल. महाराष्ट्रातील आणि देशातील सरकारला जनतेला दिलेल्या आश्‍वासनांचा विसर पडला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनची घोषणा केली होती, अच्छे दिन आले का? महागाई वाढतच चालली आहे. आज घरगुती गॅसचे दर आकाशाला भिडत आहेत. तीन वर्षांच्या दुष्काळानंतर या वर्षी कुठे चांगले उत्पादन शेतकर्‍यांना घेता आले होते पण बाजारात पिकांचे भाव कोसळले. रामेश्‍वर फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण झाले, असे शेकडो शेतकरी हा जगण्याचा संघर्ष रोज अनुभवत आहेत आणि तो सुसह्य होण्यासाठी सरकारकडे याचना करत आहेत. मात्र, ढिम्म सरकार ना त्यासाठी लक्षवेधी योजना आणत आहे, न धोरणाची अंमलबजावणी करतेय. त्यामुळे शेतकर्‍याचा हा संघर्ष सध्या तरी जैसे थे असाच आहे.

सरकारने शेतकर्‍याला वार्‍यावर सोडले, शेतकर्‍यांना मारहाण केली असे आरोप होत असताना निवडणुकांत मिळालेल्या यशाची प्रतिष्ठा राखायची कशी, यासाठी सरकारचा संघर्ष सुरू आहे. कर्जमाफी केली तर नव्या योजनांना घालावी लागणारी मुरड, दुसरीकडे सामन्यांचा, शेतकर्‍यांचा वाढता रोष, विरोधकांनी या ना त्या कारणावरून कोंडीत पकडलेली धोरणे या सार्‍यांमुळे सत्ताधार्‍यांनाही घाम फुटलाय यात दुमत नाही. यशाचा वारू चौफेर उधळला असला, तरी भाजपला मिळालेले यश त्यांना सांभाळता येत नाहीये हीच स्थिती सध्या तरी दिसतेय. झोपेत असलेल्या उठवता येते. मात्र, झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही हेच सरकारच्या वर्तणुकीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला आलेला हा संघर्ष भाजप कसा लढतोय याकडे लक्ष आहेच. शिवसेनेसाठी संघर्ष म्हणता म्हणता तारेवरची कसरतच झालेय. एकीकडे सत्ता तर दुसरीकडे प्रादेशिक पक्ष म्हणून सामन्यांचा चेहरा म्हणून लढा यात सेना पुरती अडकली आहे. कर्जमुक्तीशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशा वल्गना करणार्‍या सेना मंत्र्यांनी स्वतःच परिषदेत तो मांडला. शेतकर्‍यासाठी न्यायाचा लढा लढू म्हणणार्‍यांनी सरकारच्या प्रयत्नावरच समाधान मानून घेतले यापेक्षा शरणागती ती आणखी काय? एकूणच शिवसेनेचा संघर्ष आहे तो प्रादेशिक सत्ता टिकवण्यासाठी आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे सत्तेत राहण्यासाठी. हा संघर्ष सेनेसाठी पुरती तारेवरची कसरत झाला असून, सेना यातून कशी बाहेर पडणार, हा प्रश्‍न स्वतः सेनेलाच पडलाय.

यानंतर सगळ्यात महत्त्वाचा संघर्ष म्हणजे ज्यांनी शेतकर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या अस्तित्त्वाचाच संघर्षपट उघडला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी या संघर्षयात्रेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेऊ पाहत आहे. मात्र, अधिवेशन चालू असताना शेतकर्‍यासाठी ही संघर्षयात्रा आहे असे सांगणार्‍या काँग्रेस राष्ट्रवादीला ते शेतकरी हिताच्या धोरणांना विरोध करत आहेत हे लक्षात आले का? अधिवेशनात शेतकरी प्रश्‍न, हित, त्यासाठी आवश्यक धोरणे, चर्चा होण्याऐवजी विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. यातून नक्कीच त्यांच्या हेतूविषयी शंका आल्याशिवाय राहत नाही. सत्यपरिस्थितीला सामोरे जाऊन त्याच्या पर्यायांवर चर्चा आणि उपाय काढायला सरकारला भाग पाडणे हे विरोधकांचे काम असून, कामकाजातून अंग काढून निषेध करणे हा दीड शहाणा पर्याय त्यांना कसा सुचला याचेच आश्‍चर्य आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुने जाणते नेते असूनही महत्त्वाच्या अशा आणि लाखो रुपये ज्यावर खर्च होतात अशा अधिवेशनाला टाळून संघर्षयात्रा कसे काढू शकतात? हा जुमला मग स्वतःचे राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठीच त्यानी बांधला आहे हे स्पष्ट होते.

शेतकरीहित, कर्जमाफी यांसारख्या विषयांना हाताशी घेऊन हे राजकीय पक्ष ज्या सारीपाटावर हा सारा डाव मांडत आहेत तो अजून किती दिवस चालणार हे त्यांनाच माहीत. शिवाय यात प्यादा म्हणून ते शेतकरी आणि सामान्य माणूस यांचाच वापर करत आहेत. तेव्हा शेतकरी आणि सामान्य माणूस यांचाच जगण्याचा संघर्ष या राजकीय स्थितीमुळे आणखी बिकट होत आहे, एवढे मात्र नक्की!

सीमा महांगडे – 9920307309