मुंबई । जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी आज खुद्द संपावर गेल्याने सामान्य मुंबईकरांना त्याची झळ सहन करावी लागणार आहे. किंबहुना त्याची धास्तीच मुंबईकरांनी घेतली आहे. शेतकरी संपामुळे भाजीपाला आणि दुधाची आवाक कमी झाल्यामुळे भाज्या आणि फळांचे दरही कडाडण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकर चांगलेच धास्तावले असून त्यांनी दुध आणि भाजीपाल्याची साठा खरेदी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
डॉक्टर संप करतात, वकिल संप करतात, थोडसे काही झाले की नोकरदार उठतो आणि संप करतो. परिस्थिती कितीही हलाखीची होवो शेतकरी मात्र ढग जमायला लागले की पेरणीला लागतो. मात्र तक्रार करत नाही. परंतु यावेळी शेतकर्यांनी संपाचे हत्यार उपसले असून त्यामुळे सरकारला वठणीवर आणण्याचा निर्धार केला आहे. मात्र या संपाचा फटका शहरातील सामान्य नागरिकांनाही बसत आहे.
कर्जमाफी मिळत नसल्याने शेतकर्यांनी शेतीमाल रस्त्यांवर ओतून आपला संताप व्यक्त केला आहे. यामुळे बाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली असून भाजीपाल्याच्या भावात 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी त्रास सहन करावा लागणार आहे. संपाचा पहिला दिवस असल्याने आज त्याचा फारसा परिणाम दिसला नसला, तरी शेतकर्यांनी बेमुदत आंदोलन केल्यास याचा परिणाम नक्की जाणवेल. बंदमुळे फळे- भाजीपाला बाजारपेठा बंद झाल्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ व घाऊक बाजारावरही पाहायला मिळणार आहे. कदाचित याची जाणीव सामान्य मुंबईकरांना असल्याने भाजी आणि दुध यांची खरेदी ते आधीच करून ठेवण्याच्या तयारीत आहेत.
शेतकर्याचे हाल होत आहेत यात दुमत नाही. सरकारने कर्जमाफीचा विचार अन्यथा इतर पर्यायी व्यवस्था करयला हवी. मात्र यामुळे आमच्यासारख्या सामान्य शहरी लोकांना या निमित्ताने व्यापार्यांकडून लुटले जात आहे. भाज्यांचे दर न परवडणारे होणार त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मनीषा शिंदे
कृषी क्षेत्रच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. मात्र शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने रोज शेतकरी मरत आहेत. मात्र याचा मोठा फटका संपाच्या रूपाने आता सामान्य जनतेला बसणार आहे. यासाठी सरकारने आवश्यक त्या हालचाली करून चर्चा कराव्यात आणि हा प्रश्न मार्गी लावावा.
सुवर्णा कळंबे
ज्या प्रमाणे शेतकरी कष्ट करतो, पीक काढतो. तसेच सामान्य माणूसही मेहनत करतो आणि रोजच्या महागाईला तोंड देत असतो. दोघांच्याही समस्या सारख्या आहेत. सरकारने राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. असेच चालत राहिले तर शेतकर्यांच्या रूपाने सामान्य जनतेलाही या सगळ्याचा त्रास सहन करावा लागणार यात वाद नाही.
उज्वला गोठणकर