शेतकरी संपावर ; शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा

0

धुळे । महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या जीवनात न भुतो ना भविष्यंती असा संपाचा प्रसंग आला आहे. दि.1 जूनपासून शेतकरी संपावर गेल्याने दुध, भाजीपाला व कांदासकट अन्नधान्याची नासाडी होत आहे. शेतकरी आत्महत्या करत असतांना शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या मूलभूत प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकर्‍यांनी संपाचे हत्यार उचलले आहे. या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी उद्या शिवसेना व विविध संघटनांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कचेरीवर घंटानाद व जाहीर निदर्शनाचा कार्यक्रम ठीक 11 वाजता आयोजित केला असून या आंदोलनात विविध पक्ष,संघटना व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी केले आहे. 1 जून ते 7 जून या दरम्यान शेतकरी आपला माल कोठेही विकणार नाहीत. शेतकर्‍यांनी मुंबई, पुणे मोठ्या शहरांना होणारा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा बंद केला आहे. शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्‍नांवर सरकारने तोडगा काढून कर्ज माफ केले पाहिजे. दूध व भाजीपाल्यांचे दर वाढले पाहिजेत आदी मागण्यांसाठी शेतकरी पेटून उठला आहे. या आंदोलनात राज्यातील शेतकरी उतरले असून या आंदोलनाला पांठिबा देणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. म्हणून उद्या 11 वाजता शिवसेना पक्षासकट सर्व शेतकर्‍यांच्या बाजुने उभ्या असणार्‍या संघटनांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर घंटानाद आंदोलनासाठी मोठया संख्येने हजर राहावे, असे आवाहन माजी आमदार प्रा.शरद पाटील, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महानगरप्रमुख भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, नितीन पाटील, रावसाहेब देवरे, आधार हाके, नाना वाघ, बाबाजी पाटील, दिनेश देवरे, धीरज पाटील, शेतकरी संघटनेचे आत्माराम बाप्पा पाटील, जगदीश पाटील आदींनी केले आहे. या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.

विटाई येथील दूध डेअरी 47 वर्षांत प्रथमच बंद
साक्री तालुक्यातील बाजार समिती व उपबाजार समित्या शेतकर्‍यांनी बंद पाडल्या आहेत. साक्री तालुक्यातील सर्व दूध डेरी बंद करण्यात आल्या. विटाई येथील तीन दूध डेअरी 1970 नंतर प्रथमच बंद करण्यात आल्या आहेत. साक्री शहरातील भाजी बाजारही बंद करण्यात आला. पिंपळनेर येथे सकाळी शेतकरी संघटनेने शहरातील भाजीबाजार, फळबाजार बंद पाडले. तसेच उपबाजार समितीतील कांदा बाजारही बंद करण्यात आला. यावेळी शेतकरी व व्यावसायिकांमध्ये शाब्दीक चकमक उडाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.