मुंबई । बीटी कापसावरील बोंड अळीमुळे राज्यातील लाखो शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून, या नुकसानीबद्दल शेतकर्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले. राज्यात कापसाचा पेरा झालेल्या 40 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाला बोंडअळीचा फटका बसला आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकर्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असतांना सरकारकडे शेतकर्यांकडून 6 हजार 500 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
बीटी कॉटन बियाणास बोंडअळी प्रतिसाद देत नसल्याबाबत नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर 2015 मध्ये शासनास अहवाल दिला होता. या अहवालाची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मुंडे यांनी जुलै 2017 मध्ये शासनाला पत्र देऊन मागणी केली होती. मात्र शासनाने या अहवालाकडे आपल्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांनी केलेल्या फवारण्यामुळे 20 पेक्षा अधिक शेतकर्यांचा मृत्यु झाला आहे. बोंडअळीचे हे संकट मागील दोन वर्षांपासून कायम आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मुंडे यांनी या पत्रात केली आहे.