मुंबई । विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसर्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विधानभवनावर धडकणार आहे. यानिमित्ताने मुंबईत लाल वादळ आल्याचे चित्र आहे. या मोर्चाला भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून किसान सभेचे हे लाल वादळ सोमय्या मैदानावर मुक्काम करून आझाद मैदानाकडे सरकणार आहे. यावेळी अनेक राजकीय पुढारी या मोर्चाला भेट देऊन आपली राजकीय पोळी भाजण्याची तयारी करत आहेत. या लाल वादळात आतापर्यंत नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे तसेच राज्याच्या अन्य भागांतून तब्बल 35 ते 40 हजारांवर शेतकरी सहभागी झाले आहेत. हे मोर्चेकरी मजल-दरमजल करत अखेर आज मुंबईमध्ये दाखल झाले असून, सोमवारी विधानभवनावर धडक देऊन सरकारच्या उरात धडकी भरवणार असल्याची चर्चा सुरू आहे. या मार्चमधील शेतकर्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सोमय्या मैदानावर पिण्याच्या पाण्यासह इतर व्यवस्था करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी मोर्चेकर्यांना त्रास होऊ नये म्हणून योग्य ती दखल घेण्यात आल्याचे सांगितले तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारीदेखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. रविवार असल्याने 11 रोजी लाँग मार्चमुळे वाहतूक व्यवस्थेवर फारसा परिणाम दिसून आला नाही. मात्र, हा लाँग मार्च सोमवारी विधानभवनावर धडकणार असल्याचे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुंबईवरील चर्चेला मिळणार उत्तर
गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पाच्या आधी अधिवेशनात झालेल्या मुंबईवरील महत्त्वाच्या चर्चेला या आठवड्याच्या पहिल्या किंवा दुसर्या दिवशी उत्तर मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील रेल्वेसंदर्भात प्रश्न, गृहनिर्माण प्रकल्पातील घोळ, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतुकीचा प्रश्न, मुंबई विद्यापीठातील निकालाचा प्रश्न यांसह मुंबईतील झोपडपट्टी परिसरांतील समस्यांवर मागील आठवड्यात जोरदार चर्चा झाली होती. या चर्चेला सोमवारी किंवा मंगळवारी उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
वाहतूक मार्गात केले बदल
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन करत काही बदल केले आहेत. 11 सकाळी ठाणे येथील आनंदनगर टोल नाका पार करून सकाळी 10 वाजेच्या दरम्यान मोर्चा मुंबईत प्रवेश करणार आहे. त्यानिमिताने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईकडे येणारी वाहिनी सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक कळवा, विटावा, ऐरोली वाशी खाडी पूल मार्गे वळवण्यात आली आहे तसेच ठाण्याकडे जाणारी जड अवजड वाहनांची वाहतूक वाशी खाडी पूल ऐरोली, विटावा मार्गे वळवण्यात आली आहे. यावेळी हलक्या वाहनांसाठी दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू ठेवण्याचे आली आहे. पण त्यांचा वेग मात्र ताशी 20 किलोमीटर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
सोशल मीडियावर आक्रोश बळीराजाचा ट्रेंड
हजारो शेतकर्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने येतो आहे याची कुठलीच चर्चा माध्यम विश्वात होत नसल्याचे सांगत शेतकरी वर्गाला न्याय मिळावा या उद्देशाने नाशिकपासून मुंबईला निघालेल्या मोर्चाला सोशल मीडियावर आपण पाठिंबा देण्यासाठी युवावर्गाने आक्रोश बळीराजाचा हा ट्रेंड केला. या ट्रेंडला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून फेसबुक आणि ट्विटरवर या ट्रेंडखाली लाखो पोस्ट रविवारी करण्यात आल्या. यामध्ये सरकारच्या धोरणावर कडाडून टीका करण्यात येत आहे. यासोबतच सोशल मीडियावर सोमवारी मोर्चात येणार्या शेतकरी बांधवांसाठी मुंबईकरांना मदत करण्याबाबत आवाहन केले जात आहे. उद्या कामाला निघाल तेव्हा, लवकर निघा. सोबत डब्बा घेताना एका माणसाचं जेवण, एक पाण्याची एक्स्ट्रा असूद्या. जमल्यास केळी, सफरचंद सारखे पोटॅशिअम आणि आयर्न देणारी फळे सोबत घ्या. बिस्कीटचे पुडे ही ठेवा. मुंबईतील सर्व विहार कमिटींना नम्र विनंती. पन्नास हजार लोक येत आहेत. आपापल्या परीने मार्च मध्ये सहभागी होऊन अन्नदान, वैद्यकीय सेवा पुरवावी, असे आवाहन युवावर्गाने केले आहे.