शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत माघार नाही

0

धुळे । महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व पक्ष एकजूट झालो आहोत. आम्ही एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात परिवर्तन होऊ शकत नाही. जोपर्यंत शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी धुळ्यात दिला. विरोधी पक्षाच्या वतीने सुरु केलेली संघर्षयात्रा काल, रविवारी रात्री उशिरा धुळ्यात पोहोचली त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले की, दोन वर्षांत 9 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. घरातल्या मुली-बाळींना आत्महत्या करावी लागते. यापेक्षा दु:खद गोष्ट आहे. उप्रमध्ये निवडणूक होती म्हणून कर्जमाफी झाली. महाराष्ट्रात हा मुहूर्त 2019 च्या निवडणुकीत येईल. आमचे सरकार असताना 2007 साली कर्जमाफी केली होती. त्यासाठी आम्ही मुहूर्त काढला नव्हता.

संपूर्ण कर्ज माफ करेपर्यंत लढा सुरू
खा. चव्हाण पुढे म्हणाले की, 22 मार्चला पिक विम्याचे पैसे कर्जापोटी काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही सरकारवर दबाव टाकल्यामुळेच हा आदेश मागे घेतला. हे आपलेपहिले यश आहे. पण आपला लढा संपूर्ण कर्ज माफ करेपर्यंत थांबवायचा नाही. कर्जमाफी न करता आम्ही पुर्नगठण करु असे सांगितले गेले पण अजूनही पुर्नगठण झालेले नाही. पाणी आणि इतर समस्या सुटलेल्या नाहीत. एकही भूल कमल का फूल असे आता व्यापारी वर्ग बोलू लागला आहे. केंद्रात नरेंद्र आणि देशात दारिद्र्य अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. मशीनमध्ये काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न आता गावोगावी विचारला जात आहे.मतदान मशीन मध्ये घोळ वाढत असल्याने निवडणूक आयोग,कोर्टात तक्रारी गेल्या आहेत. मुलींना आत्महत्या करण्याची वेळ आणणार्‍या सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती
सभेला पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी,शेकापचे नेते प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.राजेश टोपे, आ.अब्दुल सत्तार, आ सुनील केदार, आ. सुमन पाटील, आ.दिपिका चव्हाण, आ. विद्याताई चव्हाण, आ. भाई जगताप, डी. पी सावंत, अमर राजूरकर, आ.यशोमती ठाकूर, आ.प्रदीप नाईक , आ. हर्षवर्धन सपकाळ.जयकुमार गोरे, आ. आ. हनुमंत डोळस आ.प्रकाश गजभिये, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते