शेतकर्‍यांना तात्काळ 10 हजारांची मदत

0

मुंबई । सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्य सरकारने छोट्या शेतकर्‍यांना आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांना खरीपाच्या बी-बियाण्यांसाठी अडचण येऊ नये, यासाठी कर्जमाफी होईपर्यंत 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही मदत देण्याची मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. या मागणीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव कॅबिनेटच्या बैठकीत मांडला. मात्र ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत शेतकर्‍यांना 10 हजार रुपये बी-बियाण्यांसाठी द्यावे. ते नंतर कापून घ्यावे, मात्र आता तातडीने मदत मिळावी म्हणून हे 10 हजार द्यावेत, अशी मागणी केली, त्याला मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

शिवसेनेची पुन्हा भाजपवर कुरघोडी
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करणार्‍या शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यासाठी तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली. कर्जमाफी झाल्यानंतर हे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यातून कापून घ्यावे. तसेच येत्या आठ दिवसांत कर्जमाफीसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जावा, अशी मागणी रावते यांनी केली. मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी बँकांशी बोलून या निर्णयाची अंमलबजावणी करतील.

आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा
या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवरही भार येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. खरीपासाठी बी-बियाणे घेण्यासाठी पैसे नसणार्‍या शेतकर्‍यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीची घोषणा जरी करण्यात आलेली असली तरी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे छोट्या शेतकर्‍यांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफीच्या प्रस्तावाचा तपशील ठरवण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी लागणार असून मंत्रिमंडळापुढे पुढील आठवड्यात त्याबाबत प्रस्ताव सादर होईल. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याविषयीची माहिती सादर करण्यात आली. मात्र, कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जुन्या नोटा घ्या, तरच कर्ज!
कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्यातील काही जिल्हा बँकांनी वेगळाच पवित्रा घेतला आहे. नोटाबंदीच्या निर्णयापासून पडून असलेल्या हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्याखेरीज कर्जवाटप करणार नाही, असा पवित्रा राज्यातील काही जिल्हा सहकारी बँकांनी घेतला आहे. राज्यातील जिल्हा बँकांकडे सुमारे सहा हजार कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा आहेत. रविवारी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर सोमवारपासूनच शेतकर्‍यांनी बँका गाठायला सुरुवात केल्याने आदेशांअभावी बँक अधिकार्‍यांची चांगलीच गोची झाली आहे.