शेतकर्‍यांना बी-बियाण्यांसह व रासायनिक खते मोफत द्या

0

भुसावळ : कोरोनाच्या कहरमुळे शेतकरी, व्यापारी व मजूर सर्वच अडचणीत आले असून शेतकर्‍यांची स्थिती तर अतिशय बिकट झाली आहे. शेतकरी कर्जबाजारी असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी दिड महिन्यांवर पेरणी आली असून अद्यापही शेती तयार नसल्याने पेरणीसाठी बी-बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य प्रमोद पल्लवी सावकारे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली असून स्थानिक प्रशासनालादेखील निवेदन दिले आहे.

शेतकर्‍यांना नवीन कर्जाची प्रतीक्षा
राज्यातील सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला अनुसरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळेस कर्जमाफीची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील लोकांना दिलासा मिळाला तर दुसर्‍या टप्प्यात दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्यांना व नियमित कर्जफेड करणार्‍यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. या प्रक्रिया सुरू असताना देशात व राज्यात कोरोना ने कहर केला त्यामुळे कर्जमाफीची योजना राबविण्यात अडथळा निर्माण बाबा आहे त्यामुळे शेतकरी नवीन कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. तर कोरोनामुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांचे व मजुरांचे काम बंद पडले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे त्याचप्रमाणे कापूस खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरू असतानाच कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून सीसीआयच्या अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्वच कापूस खरेदी केंद्रांवरील कापूस खरेदी थांबवण्यात आली होती. या परीस्थितीत कोरोणा लागण वाढत असल्यामुळे कापूस खरेदी अद्यापही बंद आहे त्यामुळे 40 टक्के शेतकर्‍यांच्या घरात अद्यापही कापूस पडून आहे. कोरोनामुळे मजुरी नाही , कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही , त्यामुळे नवीन कर्ज नाही तर मजुरी नाही, अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याची गरज आहे.