शेतकर्‍यांना युरीया न देणार्‍या गय नाही : जिल्हा कृषी अधिकारी

0

रावेर : प्रत्येक गरीब शेतकर्‍यांच्या पिकापर्यंत युरीया पोहोचला पाहिजे, युरीयासाठी शेतकर्‍यांची फिरवा-फिरव करणार्‍यांची गय केली जाणार नाही तसेच रावेरात कोणाकडे किती युरीया शिल्लक आहे याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परीषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली. ‘रावेरात युरीयाअभावी शेतकर्‍यांचा आत्महत्येचा इशारा’ या आशयाचे वृत्त बुधवार, 12 ऑगस्टच्या अंकात झळकताच कृषी विभागात प्रचंड खळबळ उडाली. दोन्ही शेतकर्‍यांना बोलावून सन्मानाने यूरीयासह रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला.

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार
रावेरात युरीयाबाबत शेतकर्‍यांची सुरू असलेली फिरवा-फिरव हा विषय अत्यंत गंभीर असून याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे तसेच राज्य सरकारनेदेखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी रावेरात केली.

कृषी अधिकार्‍यांनी केली तपासणी
यूरीयाच्या भोंगळ कारभाराचे वृत्त ‘जनशक्ती’मध्ये प्रसिध्द होताच कृषी अधिकारी एल.आर.पाटील यांनी बुधवारी दिवसभर रावेरात कृषी दुकानांची तपासणी केली तसेच युरीया कोणाकडे किती शिल्लक आहे याचीदेखील पडताळणी करण्यात आली आहे तसेच त्या दोन्ही शेतकर्‍यांना ताबडतोड युरीया देण्यात आला.

‘दैनिक जनशक्ती’चे शेतकर्‍यांनी मानले आभार
आठ दिवसांपासून यूरीयासाठी फिरणार्‍या शेतकर्‍यांना दैनिक जनशक्तीच्या बातमीमुळे यूरीया मिळाला व खतांचा साठा करून ठेवणार्‍यांचे चांगलेच ढाबे दणाणले. शेतकर्‍यांच्या भावनांची दखल घेत जनशक्तीने वृत्त प्रसिद्ध केल्याने शेतकर्‍यांनी ‘जनशक्ती’चे आभारही मानले.