शेतकर्‍यांना लागली पुन्हा पावसाची प्रतीक्षा

0

तीन दिवसांपासून पाऊस देतोय शेतकर्‍यांना हुलकावणी

भुसावळ- तालुक्यात मागील आठवड्यात समाधानकारक पावसामुळे शेतकर्‍यांनी महागड्या बियाण्यांची खरेदी करून आपापल्या शेतात पेरणीची कामे आटोपती घेतली मात्र पेरणीची कामे आटोपताच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांसमोर संकट उभे राहिले असून त्यांना पुन्हा दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. तालुक्यात मागील आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत होवून त्यांनी खरीपाच्या पिकांची पेरणी आटोपती घेतली. तालुक्यात 26 जूनला महसुल विभागाच्या भुसावळ, वरणगाव, पिंपळगाव आणि कुर्‍हे अशा चार मंडळनिहाय 51.04 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे मात्र शेतकर्‍यांनी केलेल्या खरीपाच्या पेरणीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पुन्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत लागला आहे.तसेच काही शेतकर्‍यांनी पावसाळा पुन्हा लवकर सुरू होईल, या आशेपोटी शेतातील पेरणीनंतरच्या कामालाही वेग दिला आहे.

पारा 37 अंशावर : निंदणीच्या कामांना वेग
शहर आणि परीसरात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून तापमानाचा पाराही 37 अंशावर येवून ठेपला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केलेल्या महागडे बियाणे पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात असून बाजारपेठेतील आर्थिक उलाढालही मंदावलेली दिसून येत आहे. दरम्यान, शेत-शिवारात आंतर मशागतीच्या कामांना काही ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे मजुरांच्या हातालादेखील काम मिळाले आहे.