शेतकर्‍यांना सांगलीतील साखर कारखान्यांची सैर

0

शिक्रापूर । रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आणि कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. अशोकबापू पवार यांच्या पुढाकाराने कारखाना परिसरातील शेतकर्‍यांची सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांनी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, सांगली जिल्ह्यातील वाळवे येथील हुतात्मा किसन आहीर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. तसेच सांगली जिल्ह्याच्या रायगावमधील केन अ‍ॅग्रो एनर्जी (इं) लि. कंपनीला भेट दिली. कार्यकारी संचालक जयकर पाटील यांनी यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील इस्लामपूर येथील प्रगतशील शेतकर्‍यांच्या ऊसाच्या प्लॉटची पाहणी यावेळी करण्यात आली. येथील अशोक खोत या शेतकर्‍याचे एकरी दोनशे टन ऊसाचे उत्पादन घेण्याचे उद्दीष्ट आहे. त्यांनीही यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी अशोक पवार हे सुद्धा आवर्जुन उपस्थित होते. यावेळी अशोक पवार तसेच नागनाथअण्णा नायकवडी कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवड यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. प्रा. सुभाष कळसकर, उत्तम सोनवणे, नरेंद्र माने, सुधीर फराटे, राजेंद्र गावडे, अर्जुननाना कोंडे, बाळासाहेब भुजबळ, भाऊसाहेब सोनवणे, माऊली थेऊरकर, दत्तात्रय फराटे आदींसह शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने या सहलीचा लाभ घेतला.