धुळे । शासनाच्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या ज्या शेतकर्यांचे कर्ज दीड लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांचा ओटीएस योजनेत शासनाने समावेश केला आहे. या शेतकर्यांच्या याद्या जिल्हा बँकेकडे प्राप्त झालेल्या आहेत. ओटीएस योजनेंतर्गत शेतकर्यांनी दीड लाख रुपये कर्जाचा भरणा 31 मार्चपर्यंत करण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी व संचालक मंडळाने केले आहे. जे शेतकरी उर्वरीत कर्जाचा भरणा करणार नाहीत. त्यांना दीड लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी जिल्हा बँकेसह, प्राथमिक विविध कार्यकारी सोसायटी, आदिवासी विविध कार्यकारी संस्था व इतर राष्ट्रीयकृत बँकांकडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज घेतले आहे.
कर्जाची खात्री करा
ओटीएस योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकर्यांची यादी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहे. या यादीत जिल्हा बँकेसह, राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदार शेतकर्यांचाही समावेश आहे. तसेच एकत्रित कुटुंबातील सभासदांनी घेतलेल्या कर्जाचाही समावेश आहे. अशा शेतकर्यांनी संबंधित बँकेच्या शाखेशी संपर्क करुन दीड लाख रुपयांवरील घेतलेल्या कर्जाची खात्री करुन घ्यावी.
प्रमाणपत्र आवश्यक
कर्जाचा भरणा केल्यावर संबंधित बँकेचे प्रमाणपत्र जिल्हा बँकेकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच जिल्हा बँकेकडे संबंधित शेतकर्यांना दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीची रक्कम मिळावी. यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. जे शेतकरी उर्वरीत कर्जाचा भरणा करणार नाही. त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार नसल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभही मिळणार नाही.