जळगाव। बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएमचा पिन नंबर मिळवून एका भामट्याने जळगाव तालुक्यातील नांद्रा बु . येथील कैलास रामदास पाटील या शेतकर्याला 2 लाख 37 हजार रुपयात ऑनलाईन गंडा घातला घातल्याची घटना उघडकीस आली आहे. यातच 1 जुलै ते 14 जुलै या काळात सात दिवस 36 वेळा भामट्याने पाटील यांच्या खात्यातून व्यवहार केला आहे. विशेष म्हणजे कापूस विक्रीतून धनादेशाच्या माध्यमातून जमा केलेल्या 1 लाख 84 हजार रकमेवरही गंडा घातला आहे. याप्रकरणी पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
कैलास पाटील यांची कैफियत
शेतकरी कैलास पाटील यांचे जळगावातील स्टेट बॅँकेत बचतखाते असून या खात्यावर 30 जून रोजी 53 हजार 341 रुपये इतकी रक्कम शिल्लक होती. परंतू 1 जुलै रोजी 7808818858 या क्रमांकावरुन पाटील यांच्या मोबाईलवर फोन आला. मी स्टेट बॅँकेतून बोलत असून एटीएमवरील सहा अंकी तसेच पिन नंबरबाबत क्रमांक एसएमएसद्वारे विचारणा केली. कैलास पाटील यांनी यावर विश्वास ठेवून पिन व सहा अंकी नंबर भामट्यास सांगितला. त्यानंतर दोन वेळा 3 हजार 999, तीन वेळा दहा हजार व एक वेळा 9 हजार 996 रुपये त्याच दिवशी खात्यातून कमी झाल्याचे त्यांना मेसेज आले.
जिल्हापेठ पोलिसात तक्रार
आपण कोणतीही खरेदी अथवा कोणाला धनादेश दिलेला नसताना इतकी रक्कम कशी कमी झाली म्हणून पाटील यांनी बॅँकेत जावून चौकशी केली असता ही सर्व रक्कम ऑनलाईन वळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाटील यांनी शनिवारी संध्याकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली.
मेसेजमुळे घटना उघडकीस
त्यानंतर 3 जुलै रोजी दोन वेळा एकहजार 999 व एक वेळा 999 रुपये कमी झाले. कापूस विक्रीतून बॅँकेत जमा केलेल्या 1 लाख 84 हजार 395 रुपयांचा धनादेशही सहा आकडी क्रमांक विचारुन 5 जुलै रोजी वटवून घेतला. त्यादिवशी आठ वेळा व्यवहार झाले. त्यानंतर पुन्हा 6 जुलै रोजी तब्बल 9 वेळा तर 7 जुलै रोजी 7 वेळा व 8 जुलै रोजी प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे दोन वेळा व 13 जुलै रोजी 599 रुपये बॅँक खात्यातून कमी झाले. सात दिवसात 36 वेळा व्यवहार करुन 2 लाख 37 हजार रुपये ऑनलाईन वळविण्यात आले. त्याचे मेसेज पाटील यांना मोबाईलवर प्राप्त झाले.