शेतकऱ्यांचा हरकती असलेल्या जमिनींचे अधिग्रहण होणार नाही – सुभाष देसाई

0

सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचा आपल्या जमिनी एमआयडीसीठी देण्यास हरकती आहेत. अशा शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार नाहीत. शेतकऱ्यांच्या संमतीनेच जमिनी अधिग्रहित होतील. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांशी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलतना ही माहिती दिली. दरम्यान, टप्पा ३ मधील लाभक्षेत्रातील जमिनी अधिग्रहणातून वगळणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

साताऱ्याहून मुंबईत आपल्या विविध मागण्या घेऊन काही शेतकरी अर्धनग्न होऊन मुंबईत मंत्रालयावर मोर्चा घेऊन आले आहेत. रविवारी या शेतकऱ्यांना मानखुर्द येथे पोलिसांनी अडवलं होतं. त्यानंतर या शेतकऱ्यांचा मुक्काम चेंबूर मधील साधू वासवाणी या शाळेत करण्यात आला होता. या शेतकऱ्यांना थेट मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता. मात्र, पोलिसांनी यातील ६ जणांच्या शिष्टमंडळाला आपल्याच गाडीतून मंत्रालयात घेऊन गेले. त्यानंतर या शिष्टमंडळाने सुभाष देसाई यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांची पुर्तता झाली. तसेच आपली बाजू समजून घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी शासनाचे आभारही मानले, असे देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.