शेतकऱ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारे यांची मध्यस्थी?

0

मुंबई – राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही चालू राहिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात समाजकंटकही घुसल्याचा आरोप करून तेच हिंसाचार करत असल्याचा आज दावा केला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांकही त्यांनी आज जाहीर केला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मुंबईत एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. येथून त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या वेदनांची मला जाणीव आहे. मात्र, ही आंदोलने शांततेने झाली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या वतीने सरकारशी संवाद साधण्यास आपण तयार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली फोनवर चर्चा झाली आहे. ते चर्चेला तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात कालपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ सोबत आल्यास या प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची आपली तयारी आहे. सहन करण्याची क्षमता संपल्याने शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरला आहे. सरकार दाद देत नसल्यामुळेच त्यांना कायदा हातात घ्यावा लागत आहे. अशा वेळी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी, असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

सदाभाऊंचा आरोप
दरम्यान, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या संपाचा बारकाईने अभ्यास केला तर दूध-भाजीपाला नव्हेच तर इतर मालाचीदेखील अडवणूक केली जात आहे. नासधूस केली जात आहे. हे शेतकऱ्यांनी केलेले नाही. शेतकऱ्यांच्या आडून काही मंडळी यात घुसली आहेत. गेली १५ वर्षे ज्यांनी काही केले नाही ते हे करत आहेत, असे ते म्हणाले. अडीअडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 18002330244, यावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मंत्रालयात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या संपामुळे पुणे, नाशिकमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. मुंबईत मात्र परिणाम झालेला नाही. सरकारला शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. तेव्हा त्यांनी चर्चेसाठी यावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू नये, राजकारण कसे करता येईल यादृष्टीने काही मंडळी दंगा करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे लोक रस्त्यावर येऊन दंगा करत आहेत. सरकार शेतकऱ्यांचे आहे. संप हा शांततेच्या मार्गाने करूया. मागण्या सरकारपुढे ठेवूया. चर्चा करून मार्ग काढूया. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेतली आहे. आंदोलन काळात शेतकऱ्यांवर काही गुन्हे दाखल झाले असतील तर चौकशी करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहातून स्थितीचा आढावा घेतला. संपाबाबत अफवा आणि चुकीची माहिती टोल फ्री क्रमांकावरक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.