शेतकऱ्यांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार

0

मुंबई – शेतकऱ्यांच्या दुर्दशेला काँग्रेस जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून शेतकऱ्यांनी मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये पोलीस बळाचा वापर कमीतकमी केला गेला पाहिजे, असे मतही त्यांनी नोंदवले.

भारत हा शेतकऱ्यांचा आणि गरीबांचा आहे, याचा काँग्रेसला विसर पडला आहे. त्यामुळेच आज शेतकऱ्यांची दूरवस्था झाली आहे. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची तीन वर्षांची वाटचाल यशस्वी ठरली आहे. सुशासनाला कटीबद्ध असे सरकार देशातील जनतेला हवे होते त्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत असा दावा त्यांनी केला. गेल्या तीन वर्षात केंद्रातील मोदी सरकारने देशातील आर्थिक सुधारणांना गती दिली आहे. यापूर्वी केवळ आर्थिक संकटातच आर्थिक सुधारणा केल्या गेल्या. आर्थिक स्थिती उत्तम असताना सुधारणा करणारे हे पहिले सरकार ठरले आहे. वस्तू व सेवा कर, ही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी आर्थिक सुधारणा असून, ही करप्रणाली भारतासाठी गेम चेंजर ठरेल असे राजनाथ सिंह म्हणाले. केंद्र सरकारने दहशतवाद आणि नक्षलवाद थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी उल्लेख केला. पूर्वोत्तर राज्यातील दहशतवादी घटना रोखण्यात सरकारला मोठे यश मिळाले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात पठाणकोट आणि गुरूदासपूर येथील घटना वगळता कोठेही अतिरेकी घटना घडली नाही. याच काळात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांचा खातमा करण्यात आला. हा एक उच्चांकच आहे. सध्या काश्मीरमधील परिस्थिती सुधारत असून काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. या प्रश्नावर तेथील जनतेशी बिनशर्त चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. परंतु चर्चा करताना त्यांनीही कोणतीही अट घालू नये, असे असे ते म्हणाले.

शिवसेना मित्रपक्ष
शिवसेना हा भाजपाचा मित्र पक्ष आणि परिवार आहे. दोन्ही पक्षांच्या विचारात मतभेद असू शकतात. पण, त्यांचे समाधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, असेही त्यांनी सांगितले.