पुणे :- देशासह राज्यात मान्सूनचे दाखल झाला आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने पेरणीच्या दिवसात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी कोणत्या कंपनीची बियाणे, खते वापरतात याची माहिती घ्यावी, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. पुणे शहरात आज राज्याच्या आठ कृषी विभागाची खरीपपूर्व हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खोत म्हणाले, “शेतकरी कुठले बियाणे वापरतो, कोणत्या कंपनीचे खत वापरतो याची पाहणी कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी शेतावर जाऊन करावी आणि त्याची नोंद ठेवावी. ब-याच वेळा पेरणी झाल्यानंतर पीक उगवत नाही, किंवा इतर अडचणी येतात” हे टाळण्यासाठी हा उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून त्या दृष्टीने कृषी विभागाच्या खते आणि बियाणांचा पुरवठाच्या नियोजनचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला राज्याच्या आठही कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते