जळगाव । पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाय घसरून शेततळ्यात पडलयाने मृत्यू झाला. ही घटना नशिराबादजवळील बेडी शिवारात घडली. पराग गोपाळ खाचणे (वय-28, रा. नशिराबाद) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाळ खाचणे यांचे नशिराबादजवळील बेडी शिवारात शेत आहेत. त्याठिकाणी मत्सव्यवसायासाठी पंधरा फुट खोलीपर्यंतचे शेततळे तयार करण्यात आले होते.
मुलाला वाचविण्यासाठी वडीलांचा प्रयत्न
या शेततळ्याच्या कुंपणाचे बांधकाम सुरू असल्याने गोपाळ चव्हाण हे मुलगा पराग व सालदारासोबत सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास शेतात गेले होते. कुंपणाच्या कामासाठी 8.30 वाजता पराग हा शेततळ्यात पाणी घेण्यासाठी गेला. पाणी घेतांना त्याचा अचानक पाय घसरला व तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे पाहून गोपाळ खाचणे व सालदार यांनी पाण्यात दोर फेकून मुलास वाचविण्याचा प्रयत्न केला. अखेर पराग हा शेततळ्यात बुडाला. वीस ते पंचवीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर पराग यास शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. तोच आजु-बाजूच्या शेतातील मजुरांनी देखील तेथे धाव घेतली. पराग याच्या शरीरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती पराग यास मृत घोषित केले. यावेळी कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. पराग याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ व विवाहित बहिण असा परिवार आहे.