बोदवड : तालुक्यातील जलचक्र तांडा येथे बांधावर दगड लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.
दोन्ही गटाची परस्परविरोधी तक्रार
रमजान मुलतानी यांच्या तक्रारीनुसार, जलचक्र तांडा येथे शुक्रवार, 3 जून रोजी रात्री पावणे 9 वाजता शेताच्या बांधावर संशयीत रज्जाक मनवर मुलतानी हा फिर्यादीच्या शेतातील बोर्डाजवळ दगडगोटे लावत होता. यावेळी फिर्यादीने त्याला हटकले. यावेळी रज्जाकने त्याला मारहाण करून धरून ठेवले तर युसूफ मुलतानी याने हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून दुखापत केली. रज्जाक मुलतानी, ताज अली मुलतानी, युसूफ मुलतानी, मुस्तफा मुलतानी, अकबर मुलतानी, मुख्तार मुलतानी, रखाजा मुलतानी यांनी रमजान मुलतानी (24) यास मारहाण व शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.
दुसर्या गटाचीही तक्रार
शेख रज्जाक मुलतानी (50) यांनीदेखील फिर्याद दिली. शेताच्या बांधावर दगड लावण्याच्या कारणावरून संशयीत पिरखाँ मुलतानी, समाजान मुलतानी, अयुब मुलतानी, फिरोज मुलतानी, आसिफ मुलतानी, मुसा मुलतानी, नूर मुलतानी (सर्व रा.जलचक्र तांडा) यांना मारहाण व शिवीगाळ केली तर बिरखा मुलतानी याने काठीने फिर्यादीला मारहाण केली. या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या दोन्ही परस्पर विरोधी फिर्यादीनंतर दोन्ही गटातील 14 जणांना अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.