नंदुरबार । शहादा परिसरातील शेतकर्यांच्या शेतातून ड्रीपच्या नळ्या गत महिन्यात चोरीस गेल्याने शेतकरी हतबल झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्या सहकार्याने स्वतंत्र पोलीस पथक व शेतकरी पथक तयार झाले. काल रात्री डोंगरगाव रस्त्या लगतच्या शेतात पाच जण नळ्या चोरी करतांना रंगेहाथ पकडले गेले. त्यातून एक जण फरार झाला असून चौघांनी नळ्या, शेतातील पीक चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. नळ्या खरेदी करणार्या मुख्य सुत्रधाराचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. दोंडाईचा रोड, प्रकाश रोड, डोंगरगाव रोड, पिंगाने, भादे, परिवर्धा यासह विविध भागात शेतात नळ्या चोरीस गेल्या आहेत.
पाच दिवसांपासून पोलीस कर्मचार्यांची गस्त
शहादा परिसरात शेतातील ड्रीप नळ्या पीक चोरीबाबत शेतकर्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी स्वतंत्र पथक नियुक्तीचे आदेश दिलेत. गेल्या पाच दिवसापासून पोलीस कर्मचारी गस्त घालीत आहेत. मंगळवार रात्री नेहमी प्रमाणे डोंगरगाव रस्त्यालगत मनोज पाटील व जीवन पाटील हे शेतकरी रात्री शेतात तळ ठोकून होते. मध्यरात्रीच्या सुमारास आठ-नऊ युवक हे मनोज पाटील यांच्या शेतात हरबरा पीक कापत असल्याचे लक्षात येताच त्यांनी जवळच्या दोन शेतकर्यांना संपर्क केला. त्यावेळी जीवन पाटील, पप्पू पाटील, लाल पाटील, भारत पाटील, कल्पेश गणेश पाटील, दिनेश पाटील, कान्हा पाटील हे धावून गेले. चोरी करणार्यांपैकी चार युवकांना पकडण्यात आले. एक फरार आहे. त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. मनोज पाटील यांच्या फिर्यादी वरून जयदास मोहनसिंग भिल (वय 40), देवदास बाजीराव फुलपगारे (वय 38), राजू नबू भिल ( वय 45), राकेश शाम ठाकरे (वय 35) यांना अटक केली आहे.