शेतात गाय शिरल्याच्या वादातून काकाने पुतण्याला संपवले : वाडीशेवाळेतील घटना

Pachora taluka shaken: Uncle killed nephew पाचोरा : शेतात बैल शिरल्याच्या रागातून संतप्त काकाने पुतण्याच्या डोक्यात काठीने जोरदार हल्ला केल्याने पुतण्याचा मृत्यू झाला. पाचोरा तालुक्यातील वाडीशेवाळे येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत पूनमचंद भाऊराव पाटील (49, रा.वाडी, ता.पाचोरा) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रल्हाद पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा गणेश प्रल्हाद पाटील (45) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश पाटील यास अटक करण्यात आली आहे.

गाय शिरल्याचे निमित्त बेतले जीवावर
सूत्रांच्या माहितीनुसार, पूनमचंद पाटील यांच्या मालकीची गाय त्यांच्याच शेतात चरत असताना ती काका प्रल्हाद मोतीराम पाटील (61) यांच्या शेतात गेल्याने त्याचा राग येऊन प्रल्हाद पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा गणेश प्रल्हाद पाटील (45) या दोघांनी पूनमचंद यांचा मुलगा किरणला मारहाण केली. मुलास मारहाण झाल्याचे कळताच पूनमचंद हे शेतात आला आल्याने काका-पुतण्यात वाद झाला. प्रल्हाद पाटील व गणेश पाटील या दोघांनी पूनमचंद यांना पत्नी व मुलासमोरच लाठ्या-काठ्यांनी डोक्यात वार करीत गंभीर जखमी केले. जखमी पूनमचंद यांना शेजारील शेतकर्‍यांनी तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू ओढवला.

पिंपळगाव पोलिसात खुनाचा गुन्हा
या प्रकरणी दोघा संशयीतांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींना अटक करण्यास विलंब होत असल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केली. दरम्यान, गणेश भोसले-पाटील यास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.