शेतीच्या पंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करा

0

आमदार दत्तात्रय भरणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील उजनी धरण बॅक वॉटर भागातील शेतकर्‍यांच्या शेती पंपाच्या विद्युत पुरवठ्याची वेळ वाढवून द्यावी व पूर्ववत करावी, अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार भरणे यांनी नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

इंदापूर तालुक्यातील उजनी धरण बॅक वॉटर भागातील नागरीकांना व शेतकर्‍यांना शेतीपंपाचा विद्युत पुरवठा दिवसा 8 तास व रात्री 10 तास असा सुरू होता, परंतु पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने उजनी जलाशयावरील, शेतीपंपाचा विद्युत पुरवठा सकाळी 6 व रात्री 6 तास करण्याबाबतचा आदेश दिला असल्याने शेतकर्‍यांची ऐन दुष्काळात अवस्था बिकट होणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

शेतकर्‍यांना न्याय द्या

उजनी धरण भागातील हे बॅक वॉटर शेतकरी हे धरणग्रस्त आहेत. सोलापूर जिल्ह्यात सातत्याने उजनी धरणातून पाणी मोठ्याप्रमाणात सोडण्यात येत असल्याने, धरणातील पाणीसाठा पातळी मोठ्याप्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवरील मोठा अन्याय होत आहे. या भागातील नागरिक व शेतकर्‍यांनी पूर्वीप्रमाणे दिवसा 8 व रात्री 10 तास नियमित विद्युत पुरवठा शेतीपंपासाठी मिळण्याची नितांत गरज असून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, असे साकडे पत्राद्वारे घातले आहे.

सकारात्मक निर्णय

उजनी धरण बॅक वॉटर भागातील इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना न्यायदेण्याबाबत त्यांना नियमीत शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा होण्याबाबत दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री