शेतीच्या वादातून मेंढपाळ तरुणाचा खून : हट्टी शिवारातील घटना

साक्री : प्रेमसंबंधाच्या संशयातून बहिण प्रियकरासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच संतप्त भावाने बहिणीचा गळा आवळून खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील हट्टी येथे उजेडात आल्याची घटना ताजी असतानाच हट्टी शिवारातच मेंढपाळाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडल्याने धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भगत उर्फ

भरत भगवान सुपनर (18, हट्टी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी निमाजपूर पोलिसात दहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मेंढ्या चराईच्या वादातून व शेतीच्या जुन्या वादातून ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दहा संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा
निजामपूर पोलिसात मयताच्या काकु संगीताबाई गोरख सुपनर (रा. दुसाने, ता.साक्री, ह.मु.हट्टी शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार, 16
रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्या भगत उर्फ भरत भगवान सुपनर हा मेंढ्या चारण्यासाठी हट्टी शिवारात गेला होता. तो दुसाने गावातील तुकाराम
मिस्तरी यांच्या शेताजवळ मेंढ्या चारत असतांना दुपारी चार वाजेच्या सुमारास 10 जणांनी त्याला शिवीगाळ,
धक्काबुक्की करीत मारहाण केली व संगीताबाई सुपनर यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील धक्का देण्यात आला व तुलादेखील जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपींनी दिली. भरत सुपनर याला यादव बिचकुले याने काठीने छातीवर ठोसा मारला तसेच नामदेव बिचकुले याने हातातील रूमालाने गळा आवळला तसेच अन्य आरोपींनी लाथ्या-बुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत जबर मार लागून भरत अत्यवस्थ होवून बेशुद्ध झाल्यानंतर सायंकाळी साक्री येथील रुग्णालयात हलवले असता मयत घोषीत करण्यात आले.

यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा
या प्रकरणी दामु यादव बिचकुले, नामदेव यादव बिचकुले, पिंटु यादव बिचकुले, बारकु यादव बिचकुले (रा.डोंगराळे, ह.मु.हट्टी शिवार), बुधा नागो सुपनर, सिधा नागो सुपनर, बापु नागो सुपनर, खंडु सिधा पिसाळ, मदन सिधा पिसाळ, गोरख भरत बुरुंगले (सर्व रा.दुसाने, ता.साक्री) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.