शेतीसाठी खोटे खरेदीपत्र ; पाच आरोपींना दोन वर्षाच्या शिक्षेसह अडीच लाखांचा दंड

0

मुक्ताईनगर न्यायालयाचा निकाल ; तलाठ्याचाही खोटा सही, शिक्का बनवला

मुक्ताईनगर- शेतीसाठी खोटे खरेदीपत्र तयार करून शासनासह तळवेल येथील तक्रारदाराची फसवणूक केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. न्या.संजीव ए.सरदार यांच्या न्यायासनापुढे या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर आठ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचे साक्षीदार व पुरावे पाहिल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना दोन वर्ष सक्षम कारावासासह अडीच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

शेतीसाठी खोटे खरेदी पत्राद्वारे फसवणूक
निवृत्ती जगन्नाथ पाटील (तळवेल, ता.भुसावळ) या तक्रारदाराला आरोपींनी माळेगाव येथील शेत गट नंबर 63/1 चा बनावट सातबारा उतारा, तलाठ्याची खोटी सही व शिक्के वापरून फसवले होते तर पंडित संपत निकम या नावाने मुक्ताईनगर दुय्यम कार्यालयात खरेदीखत बनवून देण्यात आले शिवाय गजू जगू निकम यांच्या मतदान कार्डावर बाजीराव सदाशीव माने यांचा फोटो लावून साक्षीदार म्हणून खोटी ओळख देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिल्याने आरोपी सुरेंद्र अवचित पालवे (नांदगाव, ता.बोदवड), युवराज भिवा तायडे (बोदवड), राजू सदाशीव पाटील (जलचक्र, ता.बोदवड), अनिल मुरलिधर तायडे (धामणदे, ता.मुक्ताईनगर), बाजीराव सदाशीव पाटील (जलचक्र, ता.बोदवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता निलेश निवृत्ती जाधव यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत कडूकार यांनी या गुन्ह्याचा तपास केला तर पैरवी अधिकारी म्हणून एएसआय नरसिंग चव्हाण व कॉन्स्टेबल रवींद्र सपकाळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी दोन वर्ष शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.