पांडुरंग फुंडकर यांनी वर्हाडात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम बर्यापैकी रुजवले होते. त्यामुळे वर्हाडातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शेती, शेतकरी आणि येथील मातीशी नाळ कायम राखणारा नेता हरपला आहे. सर्वत्र नकारात्मक स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्वावरील विश्वास ढळू न देता भाऊसाहेब फुंडकर यांनी राज्याच्या राजकीय पटलावर आपले स्थान निर्माण केले.
मी मंत्रालयात भाऊसाहेबांच्या दालनात बसलो होतो. तेथे कृषिमूल्य आयोगाचे सदस्य आणि शेतकर्यांचे नेते पाशाभाई पटेल आले. त्यांनी भाऊसाहेब तुम्हाला एक जादू दाखवतो असे सांगून एक फोन लावला. तो मोबाइल त्यांनी भाऊसाहेबांच्या हातात दिला. समोरून जी व्यक्ती बोलत होती तो आवाज ऐकून भाऊसाहेब एकदम गंभीर आणि भावुक झाले. तो आवाज होता दिवंगत भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांचा. आम्ही अॅन्टीचेंबरमध्ये बसलो असल्याने मुंडेसाहेबांचा स्पष्ट आवाज सर्वांना स्पष्ट ऐकायला येत होता. भाऊसाहेबांचे डोळे डबडबले होते. नंतर तो आवाज त्यांचा नव्हता हे त्यांना पाशाभाईंनी सांगितले. परंतु, तरीही मुंडे यांच्या आठवणीमुळे ते बराच वेळ गहिवरलेले होते. त्यांची मुंडे यांच्याशी एक वेगळीच मैत्री होती. आज त्या भाऊसाहेब फुंडकर यांचे म्हणजे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ही बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला असणार जसा मलाही बसला. कारण भाऊसाहेबांचे वय अवघे 68 वर्षांचे होते आणि त्यांना कसलाही आजार नव्हता. तसा मी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर टीका करणारा आहे. परंतु, त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीवर मोठे संकट कोसळले, असे म्हणायला हरकत नाही. खामगाव तालुक्यातील नरखेड या छोट्याशा गावी पांडुरंग फुंडकर यांचा जन्म 21 ऑगस्ट 1950ला झाला. आज 31 मे 2018 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. यामधला पांडुरंग फुंडकर यांचा प्रवास भारतीय जनता पक्षातून झालेला आढळतो. सर्वात पहिल्यांदा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुका लढवत त्यांनी सलग 3 वेळा विजय मिळवला होता. त्यानंतर फुंडकर यांच्याकडे काही काळ भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद होते तसेच त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही स्वीकारली होती. दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचे वर्चस्व होते. अशात भाजपच्या पक्षवाढीसाठी फुंडकर आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अनेक कामे केली. शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपला ग्रामीण भागापर्यंत नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजप पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेब नावाने त्यांची ओळख. त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये धडाडीने काम केले आहे. त्यांच्या कामामुळे व विचारसरणीमुळे पक्षात भाजपचे विदर्भातील ओबीसी आणि एक शेतकरी नेते अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिले जात असे.
पांडुरंग फुंडकर हे असे राजकीय नेते होते ज्यांनी नेहमी प्रसारमाध्यमांपासून लांब राहणेच पसंत केले.त्यांनी वर्हाडात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम बर्यापैकी रुजवले होते. त्यामुळे वर्हाडातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शेती, शेतकरी आणि येथील मातीशी नाळ कायम राखणारा नेता हरपला आहे. सर्वत्र नकारात्मक स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्वावरील विश्वास ढळू न देता भाऊसाहेब फुंडकर यांनी राज्याच्या राजकीय पटलावर आपले स्थान निर्माण केले. निरक्षर, गरीब शेतकरी दाम्पत्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. कोणत्याही परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता अतिशय संयमी व खंबीरपणे मार्गक्रमण करणे हा भाऊसाहेबांचा पिंड होता. शालेय शिक्षण गावी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते खामगाव आले येथेच त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची बीजे रुजली आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी राजकारणात उडी घेतली. विद्यार्थी नेते झाले तसेच आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. भाऊसाहेबांनी राजकीयच नव्हे, तर सामाजिक जीवनातही मानाचे स्थान पटकावले होते. दोन वेळा विधानसभेचे आमदार, तीन वेळा खासदार, तीन वेळा विधानपरिषदेचे सदस्य, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे कृषिमंत्री, अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्ता आणि शेतकरी हा त्यांचा श्वास होता. भाऊसाहेब फुंडकर यांची शेती आणि माती यांच्याशी घट्ट नाते जुळले होते. आमदार, खासदार, विरोधी पक्ष नेते आणि मंत्रिपद या त्यांच्या प्रवासात भाऊसाहेबांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आहेत. विदर्भातील कापूस, सोयाबीन या प्रश्नांवर भाऊसाहेब नेहमीच आक्रमक राहिले. कृषिमंत्री झाल्यानंतर शेतकर्यांमधील निराशावादी चित्र बदलायचे आहे. परवडणारी शेती करण्याचा ध्यास असल्याचे ते नेहमीच सांगत. शेतकर्यांना नवतंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, कमी खर्चातील सिंचन व्यवस्था निर्माण करणे, जलयुक्तमधील थेंब अन् थेंबाचा योग्य वापर होणे, शेतकर्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे यावर ते आग्रही होते. कोरडवाहू शेतकर्यांना अच्छे दिन आले पाहिजे, असे ते म्हणत. त्यासाठी त्यांनी काही प्रकल्पही हाती घेतले होते. शाश्वत शेतीविकास हेच ध्येय त्यांनी ठेवले होते. नातेसंबंध करताही त्यांनी शेतकरी कुटुंबांशीच नाळ कायम राखली. इतकेच नव्हे तर ते स्वतः आपल्या शेतीत नवे नवे प्रयोग करत असत. ते त्यांच्या राजकीय प्रवासात कोठेही गेले, तरी त्या ठिकाणच्या शेतीची माहिती घ्यायचे व तो नवा प्रयोग आपल्या शेतात करून पाहायचे. शेतीशी जोडलेल्या योजनांचा महाराष्ट्रात जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा, असा त्यांचा आग्रह असायचा. त्यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा आणि गावकर्यांचा गराडा पडलेला असायचा. गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूर अधिवेशनाला जाताना मी आणि पत्रकार दीपक कैतके आम्ही दोघांनी खामगावला शासकीय विश्रामगृहावर मुक्काम केला, तर तेथे खूप गर्दी जमा झालेली. आम्ही चौकशी केली तेव्हा कळाले आतमध्ये भाऊसाहेब बसले आहेत, असे सांगण्यात आले. आम्हीही थेट आत घुसलो तर गावचे शेतकरी त्यांचे प्रश्न घेऊन भाऊसाहेबांना सांगत होते आणि स्वतः भाऊसाहेब ते सोडवण्यासाठी सूचना करत होते.
आम्हाला पाहताच त्यांनी अगदी आपुलकीने बोलावले. आम्ही तिथे कसे? हा प्रश्न त्यांना पडला. काहीही बोलायच्या आत त्यांनी त्यांचा सहाय्यक केतन याला आवाज दिला व सांगितले हे आपले मुंबईचे पाहुणे आहेत. मंत्रालयातील पत्रकार आहेत तू स्वतः थांबून त्यांची काळजी घे. त्यानंतर त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. पुन्हा रात्री गप्पा मारायला येतो, असेही सांगितले. त्यांची त्यांच्या गावातील भेट आजही स्मरणात आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ कायम राखणारे नेते म्हणून भाऊसाहेब फुंडकर यांची गावात ओळख आहे. एखाद्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या गुजगोष्टी करणे ही त्यांची विशेष स्टाइल होती. त्यामुळे एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला की, तो त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता होत असे. भाऊसाहेबांच्या जाण्याने भाजपचा एक जुना शिलेदार हरपला आहे. ज्यावेळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. ग्रामपंचायत ते केंद्र सरकार सर्वत्र काँग्रेसचा बोलबाला होता. त्या काळात भाऊसाहेबांनी संघ विचारांची पताका खांद्यावर घेतली होती. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. संघाचे कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, जनसंघाच्या युवा आघाडीचे पदाधिकारी ते भाजपचे नेते असा त्यांचा प्रवास राहिला. राजकारणात त्यांनी अनेक चढउतार अनुभवले. मात्र, संयम कधी ढळू दिला नाही. पश्चिम विदर्भात भाजप रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शेती व शेतकर्यांचे प्रश्न घेऊन ते नेहमीच लढत राहिले. खामगाव ते आमगाव ही शेतकरी दिंडी गेल्या 45 वर्षांच्या त्यांच्या राजकीय प्रवासातील मैलाचा दगड ठरली. महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचा बहुजन चेहरा अशी ही त्यांची ओळख होती. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी खर्या अर्थाने भाजपला बहुजन समाजात रुजवले. भाऊसाहेब फुंडकरांच्या जीवनात काही राजकीय चढउतार नेहमीच चर्चेचे विषय राहिले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या साथीने ते राजकीय जीवनात वावरत होते. त्यांची विरोधी पक्षनेतेपदाची कारकीर्दही मी जवळून पाहिली आहे. आता सत्तेत होते तरी ते विरोधी पक्षाला कधी विरोधक वाटलेच नाहीत. सर्वांशी संयमाने आणि हसतमुखाने बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. पत्रकारांमध्येही त्यांनी कधीही भेदभाव केला नाही हे विशेष.
– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111