शेती नावावर करण्यासाठी महिलाविरूद्ध तक्रारअर्ज

0

सोयगाव । चोरी झालेल्या शेताची बोगस फेरफार झालेल्या कागदपत्रांची संचिका मिळत नसल्याने संतप्त शेतकर्‍याने बुधवारी सोयगाव तहसील कार्यालयात विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने बुधवार 12 जुलै रोजी सोयगाव तहसील कार्यालयात मोठी धावपळ झाली होती. दरम्यान शिवसेनेचे सुभाष वाडकर यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. संबंधित शेतकर्‍याने चक्क शेतजमिनीची चोरी झाल्याची तक्रार सोयगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

महिला शेतकरीला कसायला दिली जमीन
पळाशी ता.सोयगाव येथील शेतकरी शामलाल महादू परदेशी यांची पळाशी शिवारात गट क्र.163 शेती आहे. बाहेरगावी राहण्यासाठी गेल्याने शेती निम्मे बटाईने करण्यासाठी एका महिला शेतकर्‍याला दिली होती. परंतु संबंधित महिला शेतकर्‍याने स्थानिक प्रशासन हाताशी धरून कोणाचीही संमती न घेता ही शेती परस्पर कुटुंबियांच्या नावावर करून घेतली असल्याचे मूळजमीन मालक शामलाल परदेशी यांच्या लक्षात आल्यावरून त्यांनी पळाशी शिवारातील 25 एकर शेती चोरी गेल्याची तक्रार सोयगाव पोलीस ठाण्यात दिली. या कारवाईसाठी पोलिसांना लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी संबंधित शेतकर्‍याने बुधवारी सोयगाव पोलीस ठाण्यात या जमिनीची झालेल्या फेरफारची संचिका मागणीसाठी अर्ज केला असता, तहसील कार्यालयात संबंधित कागदपत्रांचे मूळ दस्ताऐवज उपलब्ध नसल्याने बोगस फेरफार केल्याची संचिका गहाळ झालेली होती. त्यामुळे शेतकर्‍याच्या मागणी अर्जावर कोणताच अधिकारी स्वाक्षरी करत नसल्याने या शेतकर्‍याला सायंकाळपर्यंत संचिका मिळाली नसल्याने संतप्त शेतकर्‍याने विषारी औषधाची बाटली घेवून तहसीलच्या आवारात प्रवेश करून आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने तहसील प्रशासनात मोठी धावपळ उडाली होती.

काय आहे प्रकरण
पळाशी ता.सोयगाव येथील शेतकरी शामलाल परदेशी यांच्या वडिलांच्या नावाने पळाशी शिवारात गट क्र.163 शेती होती.त्या जमिनीचे वारस शामलाल परदेशी यांनी जवळच्या एका महिला शेतकर्‍याला निम्मे बाटाईने शेती करण्यासाठी दिली असतांना,खरीप हंगाम सन 2017-18 मध्ये संबंधित शेतकरी या महिलेकडे निम्मे उत्पन्नाचे रक्कम मागणीसाठी गेला असता, संबंधित शेती आमची आहे. वाटल्यास शेती उतारा काढून बघा, असे उत्तर मिळाल्यावरून या शेतकर्‍याच्या लक्षात बोगस फेरफार ओढल्याचा प्रकार लक्षात आला. त्यावरून प्रकरण पुढे गंभीर झाले आहे.