लाल फितीच्या कारभाराचा मुक्ताईनगर तालुक्यात कळस
मुक्ताईनगर : तालुक्यातील चिचखेडा बु.॥ येथील शेत रस्ता वहिवाटीसंबधी रीतसर अपिल दिल्यानंतर तत्कालीन तहसीलदारांनी तत्परता दाखवत पंचनामा करून आदेशही टंकलिखीत केला होता मात्र त्यांची बदली झाल्याने प्रभारी तहसीलदारांकडे सदर आदेश स्वाक्षरीसाठी अडकून पडला आहे तर आता पेरणीचे दिवस आल्याने शेतकरी कुटुंबाला शेतरस्ता असणे गरजेचे असतानाही केवळ प्रशासनातर्फे होत असलेल्या दिरंगाईला कंटाळून शेतकरी कुटुंबाने 13 जुन रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकार्यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले.
असे आहे नेमके प्रकरण ?
तालुक्यातील चिचखेडा बु.॥ येथील रामदास गणु कोळी यांनी त्यांच्या शेतीला वहीवाटीसाठी रस्ता मिळावा म्हणून महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये मुक्ताईनगर तहसीलदारांसमक्ष शेती रस्ता वहिवाटी संदर्भात रितसर अपील दाखल केले होते. यावर तहसीलदार रचना पवार-पाटील यांनी तत्परता दाखवत तत्काळ पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा केला होता व यथोचित आदेशदेखील टंकलिखीत करण्यात आला होता. परंतु वैद्यकीय कारणास्तव तहसीलदार पवार रजेवर गेल्याने मुक्ताईनगर तहसीलदारपदी प्रभारी म्हणून मनोज देशमुख यांच्याकडे पदभार देण्यात आला. देशमुख यांच्याकडे 15 दिवसांपासून शेत रस्ता वहिवाटीची फाईल स्वाक्षरीसाठी पडून आहे. खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली असून शेतात जाण्यास रस्ताच नसल्याने व न्यायासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा मारून हैराण झाल्याने कोळी यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र देत 12 जुन पर्यंत न्याय न मिळाल्यास बुधवार, 13 रोजी रोजी तहसील कार्यालय परीसरात परीवारासह आत्मदहनाचा गर्भित इशारा दिला आहे. या पत्रावर शेतकरी रामदास कोळी , रुखमाबाई रामदास कोळी , विजय रामदास कोळी , उषा विजय कोळी , वामन रामदास कोळी, वर्षा वामन कोळी, राजु रामदास कोळी, कविता राजु कोळी (सर्व रा.चिंचखेडा बु.॥, ता.मुक्ताईनगर) यांच्या स्वाक्षर्या आहेत .
हा तर प्रशासनावर दबावाचा प्रयत्न
अर्जदाराने दाखल केलेल्या अपिलावर कार्यवाही सुरू असून अर्जदार स्वाक्षरी कामी आत्मदहनाचा इशारा देवून तहसील प्रशासनावर दबाव आणत आहे. अर्जदारासह त्याच्या कुटुंबाने आत्मदहन करू नये, या संदर्भात तहसीलदारांनी मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकांना पत्र दिले आहे.
प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
या प्रकरणाबाबत खोलात चौकशी केली असता कोळी यांच्या शेत रस्ता वहीवाटीसाठी केलेल्या अपिलाला 2016 मध्ये निकाली काढण्यात आले होते मात्र काही दिवसांपुर्वी निलंबीत झालेल्या एका मंडळ अधिकार्याने हे प्रकरण तहसीलदार अदला-बदलीचा फायदा घेत शेतकर्यास पुन्हा अपिलात जाण्याचा सल्ला दिला. प्रभारी तहसीलदार यांना या प्रकरणाबाबत प्रशासनाची दिशाभूल होत असल्याची चाहुल लागल्याने त्यांनी स्थळ निरीक्षण व चौकशी केल्याशिवाय हे प्रकरण हाताळायचे नाही, असा पवित्रा घेतला असल्याची माहिती तहसीलमधील सूत्रांनी दिली.