शेल्टर होममधून पळणारे आठ जण एलसीबीच्या ताब्यात

0

नवापूर: लॉकडाऊन दरम्यान मध्यप्रदेशमधील 34 युवक पायी जात असतांना नवापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची आरोग्य तपासणी करून (शेल्टर होम )निवारा कक्षात ठेवले होते. रात्रीच्या सुमारास 34 युवकांपैकी आठ युवकांनी शेल्टर होमच्या दरवाजाची कडी तोडून पलायन केले होते. त्यांना अवघ्या काही तासात नंदुरबार एलसीबीच्या टीमने खातगाव रेल्वे स्टेशनवर ह्या युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना नवापूरला आणण्याची कारवाई सुरूही करण्यात आली आहे.
गुजरात राज्यातून पायी चालत जाणार्‍या मध्यप्रदेशातील युवकांची नवापूर आरटीओ तपासणी नाक्यावरील हॉल येथे शासनाकडून निवारा कक्ष येथे व्यवस्था केली होती. दोन दिवसापूर्वी कला, वाणिज्य महाविद्यालयात नवापूर येथे 34 युवकांना ठेवण्यात आले होते. ह्या युवकांनी 26 रोजी निकृष्ट जेवण मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. प्रशासनाकडून त्याची तातडीने दखल घेत त्यांची भेट घेऊन सुविधा पुरविण्यासंबंधी सांगितले. असे असतांना आठ युवकांनी पलायन केले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. किशोर नवले, पोसई योगेश राऊत, पोहेकाँ. दीपक गोरे, महेंद्र नगराळे, दादाभाऊ वाघ, पो.ना. प्रमोद सोनवणे, शांतीलाल पाटील, राकेश वसावे, पुष्पलता जाधव, पोकाँ. जितेंद्र तोरवणे, राजेंद्र कटके, विजय ढिवरे, यशोदीप ओगले, सतीश घुले यांनी ही कारवाई केली आहे.