जळगाव । जिल्हा परिषद निवडणुक पार पडुन महिन्याभराचा कालावधी होत चालला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्हाभरातील जनतेचे लक्ष लागुन आहे. विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 20 मार्च रोजी संपत आहे. मंगळवारी 21 रोजी नवीन जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड होणार आहे. दरम्यान सर्वच राजकीय पक्षांची गटनोंदणी पुर्ण झाली आहे. मात्र कॉग्रेसची गटनोंदणी अद्याप पर्यत बाकी असून कॉग्रेस गटनोंदणीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी 20 रोजी गटनोंदणी करणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष संदिप पाटील यांनी दिली. पक्षातील अंतर्गत वादामुळे गटनोंदणीस अडचण येत होती. अखेर जिल्हा कॉग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत सोमवारी गटनोंदणी होणार आहे. पक्षात अंतर्गत वाद वगैरे काही नसुन कॉग्रेस कोणालाही सत्ता स्थापनेसाठी मदत करणार नसल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले.
21 रोजी होणार अध्यक्ष, उपाध्यांची निवड
जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी 34 जागेची आवश्यकता आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे 33, राष्ट्रवादी 16, शिवसेना 14 तर कॉग्रेसचे 4 सदस्य निवडुन आले आहे. भाजपाला सत्ता स्थापनेसाठी केवळ एका जागेची आवश्यकता असल्याने भाजप कोणाच्या मदतीने सत्ता स्थापन करते याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. भाजपने मित्र पक्ष शिवसेनेशी बिनशर्त पाठींब्याच्या अटीवर युती करण्याचे संकेत दिले आहे. मात्र युतीबाबत काही चिन्ह दिसून येत नसल्याने भाजप कॉग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. कॉग्रेसचे आर.जी.पाटील हे भाजपाच्या संपर्कात असून त्यांच्या मदतीने भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचे राजकीय गोठ्यात चर्चा आहे. भाजपात अध्यक्षनिवडीवरुन चुरस निर्माण झाली आहे. कॉग्रेसची गट नोंदणी झाल्यास भाजप कोणाच्या मदतीने सत्ता स्थापनार की शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून भाजपाला सत्ता स्थापनेपासून रोखता हे आगामी काळत स्पष्ट होईल.